Mundhwa Murder Case : मुंढवा ब्युटिशियन हत्याकांडाचा उलगडा! सीसीटीव्हीतील ‘त्या’ कारने आरोपीला पोहोचवले बेड्यांपर्यंत
Mundhwa Murder Case : अनैतिक संबंध आणि एक लाख रुपयांच्या मागणीवरून झालेल्या वादात गळा दाबून केली हत्या; मृतदेह टाकून देतानाचा प्रवास सीसीटीव्हीत कैद.

Mundhwa Murder Case – मुंढवा डेपोजवळ आढळलेल्या ब्युटिशियन महिलेचा खून अनैतिक संबंध, पैशाच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी, गोरखनाथ देवराव शिंदे (४४,रा. चंदनगर, मुळ. बीड) याला अटक झाली आहे. आफरीन सलीम पठाण ( २९, सध्या रा. वडगाव शेरी) हिचा खून झाला होता. ती ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. मंगळवारी (५ मे) आफरीनचा मृतदेह मुंढव्यातील कचरा डेपोजवळ सापडला.
शवविच्छेदनात गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. त्यामध्ये गोरखनाथची कार दिसून आली. पोलिसांनी आफरीन जेथून त्याच्या मोटारीत बसली ते त्याने मृतदेह टाकून देण्यापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही तपासून गोरखनाथला बेड्या ठोकल्या. चौकशीत त्याने सांगितले वर्षापूर्वी त्याची आफरीनशी बारमध्ये ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. दोघेही विवाहीत आहेत.
२ मे रोजी आफरीनने शिंदेकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तो ५ मे रोजी रात्री आफरीनला खराडी बायबास येथे भेटला. तेथून दोघे मोटारीने मांजरी खुर्दला गेले. त्या ठिकाणी दोघांचा पैशावरून वाद झाला. शिंदे याने आफरीनसाठी पन्नास हजार आणले होते. परंतु तिला एक लाख हवे होते. पैसे दिले नाही तर आपल्या संबंधाची घरी माहिती देण्याची तिने धमकी दिली.
त्यामुळे गोरखनाथने आफरीनचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आफरीनचा मृतदेह मोटारीतून कचरा डेपोजवळ टाकला होता. याचा तपास पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, विनायक येवले, प्रफुल्ल मोरे, सुरेश जाधव यांच्या पथकाने केला.





