SL Squad Announced : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
SL Squad Announced : भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

SL Squad Announced India vs Sri Lanka First Test Galle : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून गॉल (Galle) येथे सुरुवात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना अखेर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) आपल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. खेळाडूंच्या दुखापतींमुळे श्रीलंकेच्या संघ निवडीला विलंब झाला होता. या संघाचे नेतृत्व धनंजय डी सिल्व्हा (Dhananjaya de Silva) करणार असून, कामिंडू मेंडिसकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
प्रभात जयसूर्याचे भारतीय फलंदाजांसमोर आव्हान!
यजमान श्रीलंकेच्या ताफ्यात प्रभात जयसूर्यासारख्या घातक डावखुऱ्या फिरकीपटूचा समावेश आहे, ज्याच्या फिरकीचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी गॉलच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर मोठे आव्हान ठरणार आहे. याशिवाय दिनेश चांदीमल, निरोशन डिकवेला, असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमारा यांसारख्या अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.
Sri Lanka have unveiled squad for the first home Test against India in Galle 📝#WTC27https://t.co/IqRQEOQinO
— ICC (@ICC) August 12, 2026
भारतीय संघात आधीच दोन मोठे बदल!
दुसऱ्या बाजूला, भारतीय संघ आधीच गॉलमध्ये पोहोचून सरावात व्यस्त आहे. भारताने सराव सामन्यात शानदार विजयही मिळवला आहे. मात्र, मालिकेपूर्वी भारताला दोन मोठे झटके बसले आहेत. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी औकिब नबी आणि सर्फराझ खान यांना संघात सामील करण्यात आले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे.
पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ: धनंजय डी सिल्व्हा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंडू मेंडिस (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, पसिंदू सोरियाबंदरा, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशरा नुवांथा, मिलन रथनायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, दिलशान मदुशंका.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघः शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार , देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सर्फराझ खान.





