Berwal Pakistan Story : “मला ‘नरेंद्र’ नावाचा तिरस्कार…!”; भारतीय बॉक्सरने पंतप्रधान मोदींना सांगितला एक किस्सा, पाहा VIDEO
Berwal Pakistan Story : भारतीय बॉक्सर नरेंद्र बेरवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पाकिस्तानी खेळाडूविषयी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे पंतप्रधान मोदी हसू आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

CWG 2026 Medal Winner Boxer Narender Berwal Share Pakistan Boxer Funny Story : ग्लासगो येथे पार पडलेल्या ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी कमालीचे शौर्य दाखवत ३९ पदकांची लयलूट केली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. सोमवार, १० ऑगस्ट रोजी या भेटीचा एक रंजक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारताचा सिल्व्हर मेडल विजेता बॉक्सर नरेंद्र बेरवालने (Narender Berwal) पाकिस्तानी खेळाडूचा एक असा किस्सा ऐकवला, जो ऐकून पंतप्रधान मोदींसह उपस्थित सर्व खेळाडू पोट धरून हसू लागले.
काय होता तो ‘नरेंद्र’ नावाचा मजेशीर किस्सा?
पंतप्रधानांशी संवाद साधताना बॉक्सर नरेंद्र बेरवाल म्हणाला, “सर, पाकिस्तानचा विषय निघाला म्हणून मला २०१५ च्या वर्ल्ड मिलिट्री गेम्समधील एक जुना किस्सा आठवला. माझी पहिली फाईट एका पाकिस्तानी बॉक्सरविरुद्ध होती. मिलिट्री गेम्स असल्याने अधिकाऱ्यांचे फोन आले होते की काहीही झाले तरी पाकिस्तानकडून हरायचे नाही. मी ती अत्यंत अटीतटीची लढत जिंकली. फाईट दरम्यान आम्हा दोघांच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे आम्ही दोघेही रुग्णालयात टाके घालण्यासाठी गेलो होतो.”
#WATCH | “Pakistani boxer said to me ‘Aapka naam Narender hai, aapke coach ka naam Narender hai, aapke Pradhan Mantri ka naam Narendra hai. Mujhe Narendra naam se nafrat ho gayi hai’…” says Heavyweight boxer and silver medallist Narender Berwal narrating his conversation with a… pic.twitter.com/qvmwO5D2sz
— ANI (@ANI) August 10, 2026
बेरवालने पुढे सांगितले, “तिथे तो पाकिस्तानी बॉक्सर थोडा वेळ विचार करून मला म्हणाला, ‘भाईजान, एक बात बोलू? तुमचे नाव नरेंद्र आहे, तुमचे लष्करातील कोच नरेंद्र राणा आहेत आणि भारताचे पंतप्रधानही नरेंद्र मोदी आहेत. मला तर आता या ‘नरेंद्र’ नावाचा प्रचंड तिरस्कार वाटू लागलाय!'” हा किस्सा ऐकताच पंतप्रधान मोदी मोठ्याने हसले.
बॉक्सिंगमध्ये भारताचा ऐतिहासिक रेकॉर्ड!
या वेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह चौथे स्थान पटकावले. यामध्ये बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक १० पदके मिळाली, ज्यात ७ सुवर्णपदकांचा समावेश होता. भारतीय महिला बॉक्सर्सनी ७ पैकी ५ सुवर्णपदके जिंकून कमाल केली. ज्युडोमध्येही अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पटकावून इतिहास रचला, तर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ८ पदके मिळाली, ज्यात मीराबाई चानूने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले.





