Sourav Ganguly : भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी; काय आहे नेमकं प्रकरण?
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) तसेच त्यांची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) तसेच त्यांची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून सातत्याने गांगुली (Sourav Ganguly) यांच्या घरच्या पत्त्यावर ही धमकीची पत्रे पाठवली जात होती. या पत्रांमध्ये अत्यंत आक्षेपार्ह आणि अशोभनीय भाषेचा वापर करण्यात आला आहे. सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या गांगुली कुटुंबीयांनी, पत्रांमध्ये पत्नी डोना यांचाही स्पष्ट उल्लेख झाल्यानंतर अखेर पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी सोमवारी दक्षिण कोलकात्यातील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. गांगुली (Sourav Ganguly) यांच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेतले गेले नव्हते.
सौरव गांगुली यांना वैयक्तिक रागातून किंवा द्वेषापोटी त्रास देण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, धमकीच्या पत्रांचा ओघ सातत्याने सुरू राहिल्याने आणि त्यात कुटुंबातील सदस्यांचाही समावेश केल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या धमकीच्या पत्रांमध्ये एका फोन नंबरचा आणि पत्त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी या नंबरची प्राथमिक पडताळणी केली असता, ट्रूकॉलरवर हा नंबर अरुण नावाच्या व्यक्तीचा असल्याचे दिसून आले. तसेच, पत्रावर नमूद असलेला पत्ता उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बेलघरिया भागातील असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पत्रांमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेची तपासणी केली जात आहे. पत्रे पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीची खरी ओळख पटवण्यासाठी पोलीस सर्व तांत्रिक बाजू तपासून पाहत आहेत.
पत्रात नमूद केलेल्या फोन नंबरच्या सिमकार्डची पडताळणी करण्यासोबतच, ज्या कुरिअर एजन्सीच्या माध्यमातून ही पत्रे गांगुली (Sourav Ganguly) यांच्या घरी पाठवली गेली, त्या कुरिअर एजन्सीच्या संपर्कातही पोलीस आहेत. गेल्या सहा महिन्यांत आलेली सर्व धमकीची पत्रे एकाच व्यक्तीने पाठवली आहेत की यामागे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग आहे, या सर्व दिशेने पोलीस तपास करत आहेत.






