SRH vs MI : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय! हैदराबादला दुसऱ्यांदा धूळ चारत टॉप-३ मध्ये पटकावले स्थान

SRH vs MI Mumbai Indians beat Sunrisers Hyderabad : ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने पराभव केला. अशा प्रकारे मुंबईने हैदराबादला दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारत पाँइंट्सटेबलमध्ये टॉप-थ्रीमध्ये स्थान पटकावले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेनच्या ७१ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून १४३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबईने हिटमॅनच्या अर्धशतकाच्या जोरावर १५.४ षटकांत तीन गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.
सलग चौथ्या विजयासह, मुंबईने १० गुण आणि ०.६७३ च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आठ पैकी सहा सामन्यांत पराभव पत्करून नवव्या स्थानावर आहे. आता मुंबईचा सामना २७ एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी लखनौशी होईल. हार्दिक पंड्याचा संघ या सामन्यात विजय मिळवून आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.
For his match-winning spell, Trent Boult is tonight's Player of the Match 👏
Scorecard ▶ https://t.co/nZaVdtwDtv #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/EaKIAuVQMG
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2025
मुंबईने पॉइंट्सटेबलमध्ये पटकावले तिसरे स्थान-
आज खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादला मागील सामन्यात मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी होती. पण पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला या हंगामात पुन्हा एकदा त्यांच्या खराब फलंदाजीमुळे विजय मिळवता आला नाही. या सामन्यात संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि पॉवरप्लेमध्ये फक्त १३ धावांत ४ विकेट्स गमावल्या. मुंबईकडून, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या जोडीने हैदराबादच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडले. यामध्ये बोल्टने अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडच्या रूपात दोन सर्वात धोकादायक फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
हेही वाचा – SRH vs MI सामन्यात झाली फिक्सिंग? इशानच्या निर्णयाने चर्चेला उधाण, VIDEO होतोय व्हायरल
लवकरच अनिकेत वर्माही ९व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. आतापर्यंत धावसंख्या फक्त ३५ धावा होती. येथून, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेले हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी मिळून पुढील १० षटकांत ९९ धावांची महत्त्वाची भागीदारी केली आणि संघाला लढाऊ स्थितीत आणले. क्लासेनने (७१ धावा, ४४ चेंडू) शानदार अर्धशतक झळकावले. मनोहरही ४३ धावा काढून परतला. बोल्टने २० व्या षटकात २ विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे बोल्टने फक्त २६ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या.
सूर्याने मारला विजयी चौकार –
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने दुसऱ्याच षटकात सलामीवीर रायन रिकेलटनची विकेट गमावली पण त्याचा काही परिणाम झाला नाही. गेल्या सामन्यातून फॉर्ममध्ये परतलेल्या माजी कर्णधार रोहित शर्माने आणखी एक शानदार खेळी केली. रोहित आणि विल जॅक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. जॅक्स बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव क्रीजवर आला आणि रोहितसोबत त्याने संघाला विजयाकडे नेले. रोहितने ३६ चेंडूत हंगामातील त्याचे सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तथापि, विजयाच्या जवळ पोहोचल्यावर रोहित बाद झाला. शेवटी, १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सूर्याने विजयी चौकार मारला.





