SRH vs LSG Shardul Thakur revealed about comeback in IPL : सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स सामन्यानंतर जर कोणी सर्वात जास्त चर्चेत असेल, तर तो लॉर्ड शार्दुल ठाकूर आहे. कारण आयपीएल २०२५ च्या लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नव्हते, पण आता तोच शार्दुल दोन सामन्यात सहा विकेट्स घेऊन पर्पल कॅप होल्डर बनला आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की लिलावात न विकल्या गेलेल्या शार्दुलने लखनौ सुपर जायंट्स संघात प्रवेश कसा केला? या प्रश्नाचे उत्तर स्वतः या अष्टपैलू खेळाडूने दिले आहे. आयपीएल लिलावाचा दिवस आयुष्यातील वाईट दिवस – शार्दुल ठाकूर म्हणाला की, “आयपीएल लिलावाचा दिवस त्याच्या आयुष्यातील वाईट दिवस होता. त्याला खरेदीदार सापडला नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा त्याला लखनौ सुपरजायंट्सकडून फोन आला तेव्हा त्याने निर्णय घेण्यास एक मिनिटही विलंब केला नाही. आयपीएलमध्ये हे नेहमीच घडत असते. दुर्दैवाने काही संघांचे खेळाडू जखमी होतात. एलएसजीने प्रथम माझ्याशी संपर्क साधला, म्हणून मी त्यांची ऑफर स्वीकारली. मला झहीर फोन केला होता. त्यानंतर मी लखनौ संघात सामील झालो.” गोलंदाजांनाही फलंदाजांवर हल्ला करावा लागतो – लॉर्ड शार्दुल ठाकूर पुढे म्हणाला की, “माझ्यासाठी सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. मी विकेट किंवा धावांच्या स्तंभाकडे पाहत नाही. मला फक्त सामना जिंकणारा प्रभाव निर्माण करायचा आहे. एसआरएचचे फलंदाज गोलंदाजांवर हल्ला करतात. अशा परिस्थितीत गोलंदाजांनाही फलंदाजांवर हल्ला करावा लागतो. या संघाविरुद्ध आमची ही योजना होती.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की शार्दुलने दोन्ही सामन्यांमध्ये ज्या शैलीने गोलंदाजी केली आहे त्याचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. लिलावात संघ मालकांनी त्यांच्याकडे कसे दुर्लक्ष केले याबद्दल लोक संतापले आहेत. हेही वाचा – SRH vs LSG : लखनौने तगड्या हैदराबादचा धुव्वा उडवत उघडले विजयाचे खाते, शार्दुल ठाकूर ठरला विजयाचा शिल्पकार दोन्ही सामन्यात सलग दोन चेंडूवर विकेट्स घेण्याची किमया – लखनौ सुपर जायंट्सचा हा दुसरा सामना होता. यापूर्वी संघाला दिल्लीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, तिथेही शार्दुल ठाकूरने चांगली गोलंदाजी केली आणि दोन चेंडूत दोन विकेट्स घेतल्या होत्या. एसआरएचविरुद्धही त्याने दुसऱ्या षटकात सलग दोन चेंडूंवर अभिषेक शर्मा आणि नंतर मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या इशान किशनला बाद केले. याशिवाय त्याने आणखी दोन विकेट घेतल्या. अशाप्रकारे, सामन्यात त्याने ३४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या.