Sreeleela Instagram Post: AI डीपफेकवर अभिनेत्री श्रीलीलाचा संताप, फेक कंटेंटला प्रोत्साहन देऊ नका म्हणत केले आवाहन

Sreeleela Instagram Post : सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर झपाट्याने वाढत आहे. एकीकडे ही तंत्रज्ञान जीवन सोपं करत असली, तरी त्याचा गैरवापर अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे. विशेषतः मनोरंजन क्षेत्रातील कलाकार AI डीपफेक व्हिडिओंमुळे अडचणीत सापडत आहेत. आता दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीलाने याविरोधात आवाज उठवला आहे.
श्रीलीलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक नोट शेअर केली. या नोटमध्ये तिने AI द्वारे तयार होणाऱ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तिने लोकांना हात जोडून विनंती केली आहे की अशा फेक कंटेंटला प्रोत्साहन देऊ नये, कारण यामुळे एखाद्या व्यक्तीच्या सन्मानाला आणि मानसिक शांततेला धक्का बसतो.
आपल्या पोस्टमध्ये श्रीलीलाने म्हटलं आहे की तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि गैरवापर यामध्ये मोठा फरक आहे. तंत्रज्ञानाचा उद्देश माणसाचं आयुष्य अधिक चांगलं आणि सोपं बनवणं हा असायला हवा, कुणासाठीही वेदना आणि त्रास निर्माण करणं नव्हे. तसंच तिने नमूद केलं की जगातील प्रत्येक मुलगी कुणाची तरी मुलगी, बहीण, नात किंवा मैत्रीण असते, मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असो.
श्रीलीलाने हेही सांगितलं की आपल्या व्यस्त शूटिंग शेड्यूलमुळे सोशल मीडियावर चालू असलेल्या या प्रकारांची माहिती तिला उशिरा मिळाली. याबाबत वेळेत सतर्क करणाऱ्या चाहत्यांचे तिने आभार मानले. तिने स्पष्ट केलं की हा प्रकार खूपच त्रासदायक असून अनेक कलाकार याचा बळी ठरत आहेत.
शेवटी श्रीलीलाने चाहत्यांवर विश्वास व्यक्त करत, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकत्र उभं राहावं आणि AI डीपफेकसारख्या चुकीच्या कंटेंटला पाठिंबा देऊ नये, असं आवाहन केलं आहे.





