Poisonous Liquor: पुण्यात पुन्हा विषारी दारूचे रॅकेट सक्रिय! वारजेत पोलिसांनी टाकला छापा; महिलेसह तिघांवर गुन्हा
Poisonous Liquor: अवैध रित्या आणलेली २०० लिटर गावठी दारू वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ओळखीच्या ग्राहकांना केली जात होती विक्री; एका महिलेचाही समावेश.

Poisonous Liquor – शहरातील वारजे माळवाडी परिसरात मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी विषारी गावठी हातभट्टी दारू विक्री करणार्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नवसागरसह अन्य विषारी रसायने मिसळून तयार केलेली दारू विक्रीसाठी आणल्याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकीता रणधीर बिरे (वय ३५, रा. वारजे माळवाडी),
छाया कचरावत आणि ऋतिक कचरावत (दोघेही रा. वारजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई अमोल सुतकर यांनी फिर्याद दिली आहे. शिवशक्ती चौक, विठ्ठलनगर येथील महादेव मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत मंगळवारी (दि. १४) रात्री कारवाई करण्यात आली. तपासात आरोपी बिरे हिने दारू स्वतःजवळ बाळगली, तर इतर दोघांनी तिला मदत केली.
आरोपींनी सुमारे २०० लिटर गावठी हातभट्टी दारू विकत आणून विविध ठिकाणी लपवून ठेवली होती. त्यानंतर ही दारू थोड्या-थोड्या प्रमाणात ओळखीच्या ग्राहकांना विकली जात असल्याचे उघड झाले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच विषारी दारूमुळे पुण्यासह पिंपरी- चिंचवड भागातील २२ हून अधिक नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे विषारी दारू छुप्या पद्धतीने विकली जात उघड झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.





