Illegal Liquor Seized : कारवाया करूनही अवैध दारूचे धंदे सुरूच! चिखलीत किराणा दुकानात तर म्हाळुंगेत चायनीज सेंटरमध्ये दारू विक्री
Illegal Liquor Seized : अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची संयुक्त कारवाई; कार, मोपेड दुचाकी आणि स्कुटीवरून होणारी बेकायदेशीर वाहतूक उघड.

Illegal Liquor Seized – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री आणि वाहतुकीवर अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या १० ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांची देशी-विदेशी दारू, गावठी हातभट्टी आणि वाहने जप्त केली आहेत.
आळंदीतील च-होली येथे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने पाच लाख रुपये किमतीच्या स्विफ्ट कारसह २२ हजार ५ रुपयांची विदेशी दारू जप्त करत ऋषीकेश अण्णासाहेब चव्हाण (वय २८, रा. तुळापूर) याला ताब्यात घेतले. नाणेकरवाडी येथे स्कुटीवरून ३२ हजार रुपयांच्या देशी दारूची वाहतूक करताना राजकुमार राममुरत बिंद (वय २८) याला दक्षिण चाकण पोलिसांनी पकडले.
तसेच, रावेत परिसरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोपेड दुचाकीवरून बिअरची वाहतूक करणारे देबाशिश चंद्रशेखर पांडा (वय ३५) आणि मोनीरुल शहाबुद्दीन मंडल (वय २९) यांना रावेत पोलिसांनी रंगेहात पकडले. तळवडे येथील शिवरत्न हॉटेलजवळ गजानन भगवान हिप्परकर (वय २७) याला ५२ हजार ६९० रुपयांच्या देशी-विदेशी दारूसह देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले.
हॉटेल मालक विशाल भालेकर (वय ४०) हा फरार आहे. म्हाळुंगे येथील ‘एजे चायनीज सेंटर’मध्ये १० हजार २२० रुपयांची विदेशी दारू विकणाऱ्या मनोज विठ्ठल शिरसाट (वय २२, रा. कामशेत) याच्यावर उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चिंचवड येथील ‘गंधर्व बिअर शॉपी’मध्ये गोपाळ सिर्वानी (वय ४९) व राजेश जेठाणी (वय ६०) यांना सहा हजार ६८० रुपयांच्या अवैद्य दारूसह चिंचवड पोलिसांनी पकडले.
चिखलीतील किराणा दुकानातून पाच हजार ८८० रुपयांच्या दारूसह सिद्धेश्वर कोकाटे (वय ५३) याला अटक झाली. चिंबळी येथे राहत्या घरात पाच हजार २५० रुपयांची हातभट्टी दारू बाळगल्याप्रकरणी गौरी रवींद्र राजपूत (वय ३८) हिच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. तसेच मोशीतील लेबर कॅम्पमध्ये तीन हजार रुपयांची गावठी दारू बाळगणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.






