SPPU News: पुणे विद्यापीठाचा दणका! बनावट पदवीप्रकरणी तो कर्मचारी तडकाफडकी निलंबित
SPPU News: गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाची सुरक्षा मानके; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचे आवाहन.

SPPU News – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीकॉमच्या बनावट पदवीप्रकरणी वित्त व लेखा विभागातील संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेत सखोल तपासाच्या दृष्टीने चतुःश्रृंगी पोलिसांत फिर्यादही देण्यात आली आहे. वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर याने साहिल महेश कदम या विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या बीकॉमचे गुणपत्रक,
तसेच पदवी प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून ७० हजार रुपये गुगल पेद्वारे स्वीकारून व्हॉट्सऍपवर संगणकाद्वारे तयार केलेल्या मूळ कागदपत्रांसारख्या भासणाऱ्या इमेजेस दिल्या, अशी तक्रार विद्यापीठास प्राप्त झाली होती. मुखेकर हा कर्मचारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत नाही, तसेच त्याने व्हॉट्सऍपवर तयार करून दिलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नाहीत,
असे निदर्शनास आले. मुखेकरने पैसे स्वीकारून गैरकृत्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यास विद्यापीठ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले. मुखेकरने परीक्षा विभागाशी संबंधित नसताना, तसेच परीक्षा विभागाच्या व्यवस्थेबाबतचे ज्ञान वापरून गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले असून,
यात इतर कोणाचा सहभाग आहे का, ही बाब पोलीस तपासात स्पष्ट होईल. विद्यापीठाकडून जारी करण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाच्या सुरक्षामानकांचा समावेश असल्यामुळे यासंदर्भातील अफवांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
“सखोल तपासाच्या दृष्टीने चतुःश्रृंगी पोलिसांत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी रीतसर फिर्याद दिली आहे. ज्यांचा या गैरकृत्यात सहभाग आढळून येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.”
– डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव, पुणे विद्यापीठ



