SPPU News: तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना आता मिळणार मोफत शिक्षण; पुणे विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय
SPPU News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा कौतुकास्पद निर्णय; तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार.

SPPU News – सामाजिक समावेशकता आणि समानतेच्या मूल्यांना अधिक बळकटी देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शैक्षणिक शुल्क न आकारण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. विद्यापीठाचा हा निर्णय वंचित घटकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विद्यार्थी हित, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणारे अनेक ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये रशिया, जर्मनी आणि युनायटेड किंग्डममधील नामांकित विद्यापीठांशी शैक्षणिक व संशोधन देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. तसेच, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) सहकार्याने एम.एस्सी. (व्हायरॉलॉजी) हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.
यासोबतच जयकर ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांच्या सुरक्षेसाठी विमा पॉलिसीचे नूतनीकरण आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजना अधिक सक्षम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत २०२६-२७ करिता १९ कोटी रुपयांच्या भरीव अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, सोलर सिस्टिम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमा राबवल्या जाणार आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली.





