Chandrakant Patil : पुणे विद्यापीठाने काय भरीव काम केले? उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा थेट सवाल
Chandrakant Patil : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमटिक्सच्या नवीन इमारत व संशोधन केंद्राचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

Chandrakant Patil – आम्ही नाविन्यपूर्ण संशोधन केले, असा दावा राज्यातील एकही विद्यापीठ करीत नाही. आयआयटी रोज नवे संशोधन करीत असून, समाजाला काहीतरी देत आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोणते भरीव काम केले ? अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठांच्या कामगिरीबाबत शुक्रवारी नाराजी व्यक्त केली.
विद्यापीठाने भरीव काम केले असल्यास मला माफ करा, अशी कोपरखळीही पाटील यांनी मारली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) पुणे विद्यापीठातील स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमटिक्सच्या नवीन इमारत व संशोधन केंद्राच्या उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. माशेलकर यांनी शालेय शिक्षणातील गणिताच्या घसरत्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ ज्ञान शिकवणे पुरेसेनाही. नव्या ज्ञानाची निर्मिती करणारी विद्यापीठे उभी राहणे ही काळाची गरज आहे. भारताला जागतिक नेतृत्व मिळवायचे असेल, तर ज्ञानाचे ग्राहक नव्हे तर ज्ञानाचे निर्माते बनावे लागेल, असेही डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी संशोधन, दर्जेदार प्रशिक्षण आणि उद्दिष्टपूर्ण कार्य या तीन सूत्रांवर भर दिला. संशोधनाला अधिक गती देण्यासाठी डॉ. माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधकांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. या गटांच्या माध्यमातून दर दोन महिन्यांनी राज्यातील संशोधन प्रकल्पांचे मूल्यमापन केले जाईल आणि अशा उपक्रमांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी स्वागत केले. कुलगुरू डॉ. राजेश इंगळे आणि डॉ. तुषार देशमुख यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व समाजाभिमुख संशोधन प्रकल्पांचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला ॲड. अशोक पलांडे, प्रा. आनंद काटीकर आदी मान्यवर उपस्थित होते.





