Asian Games 2026 : क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या ७६८ जणांच्या जम्बो पथकाला मंजुरी
Asian Games 2026 : जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या २०व्या आशियाई खेळांसाठी ७६८ सदस्यीय भारतीय पथकाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये २६९ पुरुष आणि २३४ महिलांसह एकूण ५०३ खेळाडूंचा समावेश आहे.

Asian Games 2026 Sports Ministry Approves 768 Member Indian Contingent : जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) साठी भारताने पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बुधवारी ७६८ सदस्यीय भव्य भारतीय पथकाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या महापथकात ५०३ खेळाडू आणि २४६ अधिकारी व सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. भारताचे खेळाडू ३६ विविध क्रीडा प्रकारांमध्ये पदकांसाठी झुंजणार आहेत.
२३४ महिला खेळाडूंचा सहभाग; २५० हून अधिक सपोर्ट स्टाफ – (Asian Games 2026)
सुरुवातीला क्रीडा मंत्रालयाने ४९२ खेळाडूंना मंजुरी दिली होती, मात्र नंतर ॲथलेटिक्स चमूमध्ये आणखी काही नावे जोडण्यात आली. आता या चमूत २६९ पुरुष आणि २३४ महिला खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील. खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी १५० प्रशिक्षक, २३ मुख्य/उपमुख्य प्रशिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ आणि फिजिओ यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय पथकाचे ‘शेफ डी मिशन’ म्हणून सहदेव यादव तर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. दिनशॉ पारदीवाला जबाबदारी सांभाळतील.
नीरज चोप्रा दुखापतीमुळे बाहेर; ७९ सदस्यीय ॲथलेटिक्स पथकावर मदार –
BREAKING 🚨
The Ministry of Youth Affairs & Sports has approved a 768-member Indian contingent for the 20th Asian Games in Aichi-Nagoya, Japan.
503 athletes – 269 men, 234 women
The official list has 246 team officials, including 23 chief/deputy chief coaches and 150 coaches,… pic.twitter.com/o1d5ELDxTB
— RevSportz Global (@RevSportzGlobal) September 2, 2026
भारतीय पथकात ॲथलेटिक्सचा चमू सर्वाधिक ७९ खेळाडूंचा असून त्यांच्यासोबत ३१ जणांचा सपोर्ट स्टाफ असेल. मुख्य प्रशिक्षक पी. राधाकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मैदानात उतरेल. मात्र, भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याच्या अनुपस्थितीत इतर युवा खेळाडूंवर पदकांची लयलूट करण्याची मोठी जबाबदारी असेल.
क्रिकेट संघाला व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मार्गदर्शन; पदकांची शंभरी पार करण्याचे लक्ष्य!
क्रिकेटमध्ये भारताचे पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ सुवर्णपदकासाठी मैदानात उतरतील. या दोन्ही संघांच्या २० सदस्यीय सपोर्ट स्टाफचे नेतृत्व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण करणार आहेत. २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४० कांस्य अशा एकूण १०६ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. यावेळीही पदकांची शंभरी पार करून पदकतालिकेत स्थान अधिक भक्कम करण्याचा भारताचा मानस आहे.





