Sports In Pune : एनइसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेस शनिवारपासून प्रारंभ…

पुणे – डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली २२व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ ५०,०००डॉलर महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी २० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत रंगणार आहे.
एनईसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा ही भारतातील दीर्घकाळ चालत असलेली स्पर्धा असून या स्पर्धेतून खेळलेल्या आर्यना सबलेंका आणि इमा राडूकानू यांनी दोन ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. तसेच, या स्पर्धेत याआधी विजेतेपद पटकावलेल्या इमा राडूकानू, आर्यना सबलेंका, बोजना जोवानोवस्की, मागदा लीनेटी, कॅटेरीना बोंडारेन्को या खेळाडूंनी डब्लूटीए टूरमध्ये अव्वल २०खेळाडूंमध्ये देखील स्थान प्राप्त केले आहे.
Australian Open 2024 : सुमित नागलचे आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरीत चिनी खेळाडूकडून पराभव…
२३ वर्षांपुर्वी नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटीच्या(एनइसीसी) च्या अनुराधा देसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराने एकाच प्रयोजकाचा पाठिंबा लाभलेली आणि सर्वाधिक कालावधीसाठी सुरु असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), एआयटीए यांच्या पुढाकाराने यावर्षी या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावण्यात आला आहे. एआयटीएचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण डब्लूटीए गुण मिळवण्याची संधी मिळणार आहे.





