National Sports Day: पुणे क्रीडा राजधानीकडे…! महापौर चषकाचा मोठा टप्पा
National Sports Day: पुणे शहराला देशाची क्रीडा राजधानी बनवण्यासाठी महापालिकेचा पुढाकार; 'महापौर चषक'द्वारे ७,५०० खेळाडूंना मोठे व्यासपीठ.

National Sports Day: पुणे हे शिक्षण, संस्कृती, कला आणि उद्योगांसोबतच क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे शहर म्हणून देशाच्या नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून आहे. या शहराने महाराष्ट्राला आणि देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. आजही पुण्याच्या शाळा, महाविद्यालये, क्रीडा मंडळे आणि मैदानांवर असंख्य होतकरू खेळाडू आपल्या स्वप्नांसाठी घाम गाळत आहेत.
या प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळावे, त्याच्या गुणवत्तेला योग्य संधी मिळावी आणि पुण्यातून भविष्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, या व्यापक उद्देशातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा’ राबविली जात आहे. महापौर म्हणून या परंपरेचा अभिमान आहे आणि त्याचबरोबर तिला अधिक व्यापक, आधुनिक आणि खेळाडू-केंद्रित स्वरूप देण्याचा माझा संकल्प आहे.
माझ्यासाठी महापौर चषक म्हणजे केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही. हा पुण्याच्या तरुणाईच्या सामर्थ्यावर ठेवलेला विश्वास आहे. मैदानावर मेहनत करणार्या मुला-मुलीला या उपक्रमातून एक संदेश मिळतो, तो म्हणजे तुमच्या कष्टांची दखल घेतली जात आहे आणि तुमच्या स्वप्नांच्या प्रवासात पुणे महानगरपालिका तुमच्यासोबत आहे.
देशाच्या क्रीडा धोरणापासून पुण्याच्या मैदानापर्यंत
भारतामध्ये क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’सारख्या उपक्रमांमधून तरुणाईला खेळाशी जोडण्यावर आणि तळागाळातील प्रतिभेला संधी देण्यावर भर देण्यात आला आहे. ‘खेलो इंडिया’मुळे शालेय आणि युवा स्तरावरील खेळाडूंना स्पर्धेचे व्यासपीठ, प्रतिभा शोधण्याची संधी आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक प्रोत्साहन मिळत आहे.
या राष्ट्रीय क्रीडा वातावरणाला महाराष्ट्रातही सक्षम नेतृत्वाची जोड मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंना दर्जेदार सुविधा, प्रशिक्षक, पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडासंपन्न पुण्याला मोठी भूमिका बजावता येऊ शकते. पुण्यातील क्रीडा क्षेत्रासाठी मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.
क्रीडा प्रोत्साहन म्हणजे केवळ कार्यक्रमांना उपस्थित राहणे नव्हे, तर गरजू आणि गुणवंत खेळाडूच्या संघर्षात प्रत्यक्ष उभे राहणे होय. नेमबाज स्वरूप उन्हाळकर यांच्या क्रीडा प्रवासाला त्यांनी दिलेले सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय तसेच पॅरालिम्पिक स्तरावरील संधींसाठी केलेले प्रयत्न याचे उदाहरण आहे. खेळाडूला केवळ टाळ्या नको असतात; त्याला संधी, आधार आणि विश्वास हवा असतो. हीच भावना महापौर चषकाच्या माध्यमातून व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
क्रीडा क्षेत्रातील गुंतवणूक म्हणजे भविष्यातील गुंतवणूक
सन 2025-26 मधील विविध क्रीडा स्पर्धांसाठी काही कोटी रुपयांचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेळाडू व पंचांचे मानधन, प्रवास भत्ता, निवास व्यवस्था, क्रीडा साहित्य, मैदान किंवा हॉलचे भाडे, मैदानाची तयारी, स्टेशनरी आणि अन्य आवश्यक खर्चांचा समावेश आहे. याशिवाय विविध स्पर्धांतील खेळाडूंना सुमारे रुपये 1.60 कोटींची पारितोषिके देण्यात येत आहेत. हा खर्च केवळ आकडा नाही; तो क्रीडा क्षेत्रावरील विश्वासाचे प्रतीक आहे. प्रत्येक रुपया खेळाडू आणि क्रीडा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी उपयोगी पडला पाहिजे. माझ्या दृष्टीने या गुंतवणुकीचे खरे मूल्य तेव्हा दिसेल, जेव्हा एखादा खेळाडू या स्पर्धेतून पुढे जाऊन राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याचे नाव उज्ज्वल करेल.
सहभागाला प्रोत्साहन
खेळ केवळ पदकांसाठी नसतो. खेळ माणूस घडवतो. त्यातून संयम आणि पराभव स्वीकारण्याची मानसिक ताकद निर्माण होते. आजच्या डिजिटल युगात मुलांना मैदानी खेळांकडे वळवणे ही मोठी सामाजिक गरज आहे. महापौर चषकासारख्या स्पर्धा मुलांना पुन्हा मैदानाशी जोडण्याचे काम करतात. एक मूल मैदानावर येते, सराव करते, स्पर्धेत सहभागी होते आणि स्वतःच्या क्षमतेनुसार पुढे जाते हीच या उपक्रमाची सर्वात मोठी उपलब्धी आहे.
पुण्यातील मुली विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांच्या क्षमतेला अधिक प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मुलींना सुरक्षित, सन्मानजनक, दर्जेदार क्रीडा वातावरण मिळावे, त्यांचा सहभाग वाढावा व पुढील स्तरावर जाण्यासाठी आवश्यक संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुण्याची क्रीडा ओळख ही मुली, महिला खेळाडूंच्या यशामुळेही समृद्ध झाली पाहिजे.
पुढील वाटचालीसाठी नवे प्रयत्न
यातून गुणवत्ता दाखविणार्या खेळाडूंची स्वतंत्र नोंद ठेवणे, त्यांच्या कामगिरीचा डिजिटल डेटाबेस तयार करणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, विविध स्तरावरील संधींसाठी त्यांना तयार करणे, या दिशेने पुढील काळात प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. माझे स्वप्न आहे की, महापौर चषकातून उद्याचा महाराष्ट्राचा आणि भारताचा खेळाडू घडावा. या प्रवासात खेळाडूंसोबत आपल्या सर्वांचीच भूमिका तितकीच महत्त्वाची आहे.
खेळाडूच्या यशामागे पालकांचे त्याग, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि क्रीडा संघटनांचे सातत्यपूर्ण प्रयत्न असतात. ‘महापौर चषक’ या नावात चषक आहे, पण त्यामागील स्वप्न त्यापेक्षा खूप मोठे आहे. आज मैदानाच्या एका कोपर्यात सराव करणारा विद्यार्थी उद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिरंगा फडकवू शकतो. या शक्यतांवर विश्वास ठेवणे आणि त्या शक्यतांना संधी देणे, हेच महापौर चषकाचे खरे उद्दिष्ट आहे.
पुण्याला क्रीडा राजधानी बनविण्याचा संकल्प
महापौर म्हणून पुण्याचा विकास म्हणजे केवळ पायाभूत सुविधांचा विकास नव्हे. शहराचा खरा विकास तेव्हाच होतो, जेव्हा पुढची पिढी आत्मविश्वासू आणि गुणवत्तापूर्ण बनते. त्यासाठी खेळाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. महापौर चषकाला केवळ वार्षिक क्रीडा स्पर्धा न ठेवता पुण्याच्या क्रीडा चळवळीचे व्यापक व्यासपीठ बनविणे, हा माझा संकल्प आहे. पुण्याच्या प्रत्येक परिसरात खेळाची संधी उपलब्ध झाली पाहिजे.
आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही प्रतिभेला थांबावे लागू नये. आज आपण केलेली क्रीडा क्षेत्रातील गुंतवणूक उद्या पदकांच्या रूपाने परत येईलच; पण त्यापेक्षा मोठा परतावा म्हणजे हजारो मुलांच्या जीवनात निर्माण होणारा आत्मविश्वास, आरोग्य, शिस्त आणि मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता. महापौर चषक हा पुण्याच्या क्रीडा परंपरेचा वारसा, वर्तमानातील खेळाडूंच्या कष्टांचा सन्मान आणि भविष्यातील चॅम्पियनच्या स्वप्नांची खरी सुरुवात आहे.
मोठे व्यासपीठ अन् समान संधी
सन 2025-26 मध्ये सुमारे 7,500 खेळाडूंचा सहभाग, ही महापौर चषकाची व्यापकता दर्शविणारी बाब आहे. एखाद्या छोट्या मैदानावर किंवा शाळेच्या स्पर्धेतून सुरुवात करणारा खेळाडू जेव्हा महापौर चषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर उतरतो, तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाला मोठी चालना मिळते. स्पर्धेत विजय महत्त्वाचा आहेच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे सहभागी होणे, स्वतःची क्षमता तपासणे, पराभवातून शिकणे आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे.
आज या स्पर्धेत सहभागी होणारा विद्यार्थी उद्या जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकतो. त्यामुळे महापौर चषक ही भविष्यातील क्रीडा प्रतिभा शोधण्याची महत्त्वाची प्रक्रिया आहे. महापौर चषकाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा व्यापक क्रीडा आवाका. बुद्धिबळ, जलतरण, कबड्डी, मल्लखांब, योग, धनुर्विद्या, शूटिंग, अॅथलेटिक्स, वॉलीबॉल, बेसबॉल, कॅरम, क्रिकेट, हँडबॉल, रोलर स्केटिंग, सॉफ्टबॉल अशा विविध खेळांना या उपक्रमातून व्यासपीठ मिळत आहे. आपण केवळ लोकप्रिय खेळांपुरते मर्यादित राहू शकत नाही. एखाद्या मुलाची ताकद क्रिकेटमध्ये असेल, एखाद्याची बुद्धिबळात तर एखादा जलतरण, मल्लखांब, धनुर्विद्या किंवा अॅथलेटिक्समध्ये चमकू शकतो. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते आणि त्या क्षमतेला योग्य संधी मिळणे आवश्यक आहे.
– सौ. मंजुषा दीपक नागपुरे, महापौर, पुणे महापालिका.







