Sports In Pune : जिल्हा स्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भूमीका लखनला विजेतेपद…

पुणे – युवा उद्योजक आणि माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक जिल्हा स्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत शनाया सोनावणे, पूर्वा सातव, संध्या सोनवाल, आर्या सातव, श्रीशा नागुल, सुविज्ञा दोडके, भूमिका लखन यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रींग उभारलेल्या या मैदानात अंतिम फेरीत कॅडेट गर्ल्स २७ ते ३० वजनी गटात पुर्वा सातवने प्रणिती क्षीरसागरचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ३३ ते ३६ वजनी गटात संध्या सोनवालने अनुष्का भारद्वाजचा ४-१ असा तर, ४० ते ४३ वजनी गटात आर्या सातवने परी पारधेचा ५-० असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
क्यूब गर्ल्समध्ये ३० ते ३३ वजनी गटात शनाया सोनावणेने परिनिधी बिवालचा ५-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सब – ज्युनिअर ४६ ते ४९ वजनी गटात सुविज्ञा दोडकेने श्रद्धा चौधरीचा ५-० असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. ३७ ते ४० वजनी गटात श्रीशा नागुल हिने रेणुका कुंभारचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. ज्युनियर ५२ ते ५४ वजनी गटात भूमिका लखनने रेणुका कदमचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.





