SP Nikhil Pingle : सातारची सांस्कृतिक परंपरा अभिमानास्पद; पोलीस अधीक्षकांनी केले सातारकरांचे कौतुक
SP Nikhil Pingle : दास्तान कला अकादमी व साप्ताहिक भूमीशिल्प आयोजित 'आवाज जोपासना' कार्यशाळेचा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या उपस्थितीत समारोप.

SP Nikhil Pingle – अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने उभी असलेली सातारा नगरी केवळ ऐतिहासिक भूमी नसून कला, साहित्य, संस्कृती आणि अभिरुचीची समृद्ध परंपरा जपणारी नगरी आहे. महानगरांच्या तुलनेत साताऱ्यासारख्या शहरात सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात, ही कौतुकास्पद बाब असून अशा उपक्रमांसाठी परिश्रम घेणाऱ्या हातांचा मला अभिमान वाटतो.
खऱ्या अर्थाने महाराष्ट्रधर्म आणि संस्कृती साताऱ्यात जपली गेली आहे, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केले. दास्तान कला अकादमी व साप्ताहिक भूमीशिल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भाषण, संभाषण व आवाज जोपासना’ या दहा दिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, ज्येष्ठ रंगकर्मी व आवाज प्रशिक्षक तुषार भद्रे, भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पिंगळे म्हणाले, ‘पुणे शहरात क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असताना झोपडपट्टी भागात जाण्याचा अनेकदा अनुभव आला. आर्थिक मर्यादा असतानाही तेथील नागरिक सण-उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवताना दिसतात. बैल नसतानाही बैलपोळा साजरा होतो, कोजागिरीनिमित्त दुधाचे वाटप होते, तर दिवाळीत लहान मुले किल्ले उभारून संस्कृतीशी नाते जपत असल्याचे चित्र दिसते.
याउलट मोठ्या शहरांतील टोलेजंग इमारतींमध्ये सांस्कृतिक अभिरुची जपण्याला फारसे प्राधान्य दिले जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले. संवादकौशल्य आणि आवाज जोपासनेच्या महत्त्वावर भाष्य करताना प्रभावी बोलणे हे केवळ शब्दांवर नव्हे, तर आवाजाच्या चढउतारांवर आणि सादरीकरणावर अवलंबून असते, असे वैशाली राजमाने यांनी सांगितले. बोलणे प्रवाही आणि आशयपूर्ण असेल, तरच ते परिणामकारक ठरते, असे त्यांनी सांगितले.





