Ambenali Ghat Accident : ३ गंभीर अपघात, अनेक बळी…; महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग ‘मृत्यूचा घाट’ का बनतोय? वाचा भयानक वास्तव
Ambenali Ghat Accident : सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्याच जिल्ह्यात घाटरस्त्यांची दुरवस्था; 'स्टील क्रॅश बॅरिअर' आणि संरक्षक भिंतींअभावी पश्चिम घाट बनतोय मृत्यूचा सापळा.

Ambenali Ghat Accident – महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले. सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ सुमारे ७०० ते ८०० फूट दरीत कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पश्चिम घाटातील धोकादायक वळणांचे वास्तव या दुर्घटनेने पुन्हा एकदा समोर आणले आहे.
आंबेनळी घाट हा सातारा आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा अतितीव्र उतार, खोल दऱ्या आणि अरुंद वळणांनी भरलेला घाट म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात धुके, निसरडे रस्ते आणि कमी दृश्यमानता यामुळे हा मार्ग अधिक धोकादायक ठरतो. दुर्घटनेनंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी ट्रेकर्स, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांना जीव धोक्यात घालून अनेक तास रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले.
ही परिस्थिती केवळ अपघाताची नव्हे, तर प्रशासनाच्या दीर्घकालीन दुर्लक्षाची गंभीर घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नेतृत्व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर पश्चिम घाटातील घाटरस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक तीव्रतेने पुढे आला आहे. केवळ शोक व्यक्त करून चालणार नाही, तर तातडीने ठोस आणि आक्रमक उपाययोजना राबविण्याची वेळ आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, पश्चिम घाटातील धोकादायक घाटांमध्ये उंच आणि मजबूत संरक्षक भिंती उभारणे अत्यावश्यक झाले आहे. अनेक ठिकाणी असलेले कमकुवत कठडे किंवा तुटलेले बॅरिकेड्स मृत्यूला आमंत्रण देत आहेत. घाटातील तीव्र वळणांवर ‘स्टील क्रॅश बॅरिअर’, रिफ्लेक्टरयुक्त चेतावणी फलक, सौरऊर्जेवरील प्रकाश व्यवस्था आणि वेग नियंत्रण यंत्रणा तातडीने बसविणे गरजेचे आहे.
याशिवाय प्रत्येक धोकादायक घाटासाठी स्वतंत्र आपत्कालीन बचाव यंत्रणा उभारणे, सीसीटीव्ही नेटवर्क, ड्रोन सर्व्हेलन्स आणि रात्रीच्या वाहतुकीवर नियंत्रण यांसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक मानली जात आहे. पावसाळ्यात अतिजोखमीच्या घाटांमध्ये जड वाहनांसाठी वेळेचे निर्बंध घालण्याची मागणीही जोर धरत आहे.
घाटसुरक्षेतील उणिवांचा गंभीर इशारा
आंबेनळीतील आठ निष्पाप जीवांचा बळी हा केवळ अपघात नाही, तर घाटसुरक्षेतील उणिवांचा गंभीर इशारा आहे. पश्चिम घाटातील वळणदार रस्ते पर्यटन आणि व्यापारासाठी जीवनवाहिनी असले, तरी ते “मृत्यूचे घाट” ठरू नयेत यासाठी शासनाने आता युद्धपातळीवर काम करणे गरजेचे आहे. अन्यथा प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ अश्रू, शोकसभा आणि आश्वासनांचेच चक्र सुरू राहील.
आंबेनळी घाटातील भयंकर अपघात
१. आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ घाटात कोसळून आठ जण ठार
२. 29 जुलै 2018 मध्ये दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची बस घाटात कोसळून 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू
३. 18 एप्रिल 2026 रोजी महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर घाटाच्या हद्दीत एक कार 900 फूट दरीत कोसळून एका दांपत्याचा जागीच मृत्यू





