Satara News : समर्थ मंदिर परिसरात पालिकेचा बुलडोझर! एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; परिसरात प्रचंड तणाव
Satara News : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सातारा पालिकेची धडक कारवाई; नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३० अतिक्रमणांवर अखेर चालवला बुलडोझर.

Satara News – शहरातील वाहतूक कोंडीचे केंद्र बनलेल्या समर्थ मंदिर परिसरात अखेर सातारा पालिकेने सोमवारी सकाळपासून बुलडोझर उतरवत आक्रमक रुंदीकरण मोहीम राबवली. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांवर थेट हातोडा पडल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या कारवाईमुळे समर्थ मंदिर ते बोगदा परिसर अक्षरशः रणांगण बनला होता.
पालिकेने यापूर्वी संबंधित मिळकतधारकांना नोटिसा बजावून अतिक्रमणे स्वतः हटविण्याची संधी दिली होती. मात्र, नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यानंतर अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत थेट कारवाई सुरू केली. काही मिळकतधारकांनी “आमचे आम्ही काढून घेतो” म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी कारवाईला विरोध दर्शवला. तरीही पालिकेने कोणतीही माघार न घेता नियोजनाप्रमाणे मोहीम सुरू ठेवली.
पालिकेच्या अतिक्रमण विभागासह बांधकाम, आरोग्य, शहर विकास आणि विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस आणि वाहतूक शाखेचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती, तर नागरिक मोठ्या संख्येने कारवाई पाहण्यासाठी जमले होते.
पालिकेच्या या धडक मोहिमेत सुमारे ३० मिळकतधारकांवर कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासन आता कठोर पावले उचलत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. समर्थ मंदिर परिसरातील ही मोहीम आगामी काळात शहरातील इतर भागांतील अतिक्रमणधारकांसाठीही इशारा मानली जात आहे.
एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, कारवाईदरम्यान इक्बाल बागवान यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ हस्तक्षेप केला आणि त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.





