Koynanagar News – सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आणि कोयना प्रकल्पामुळे देशाच्या नकाशावर ठळक ओळख निर्माण केलेले कोयनानगर आज आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभे आहे. एकेकाळी गजबजलेले करमणूक केंद्र आता शांततेत हरवत चालले असून, इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कोयना प्रकल्पाच्या उभारणीच्या काळात या करमणूक केंद्राने केवळ मनोरंजन नव्हे, तर सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जडणघडणीचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून काम केले. नाट्यप्रयोग, चित्रपट, संगीत मैफिली, विविध स्पर्धा, या साऱ्यांनी कोयनानगरच्या जीवनाला एक वेगळाच रंग दिला होता. संध्याकाळ होताच येथे कुटुंबांची गर्दी उसळायची आणि हा परिसर जिवंत व्हायचा. या केंद्राच्या शेजारीच असलेले ‘बालक मंदिर’ हे त्या काळातील बालविकासाचे केंद्र होते. प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या मुलांची येथे बालवाडी भरायची. टेबल टेनिस, कॅरम यांसारख्या इनडोअर खेळांनी मुलांचे बालपण फुलायचे. तर करमणूक केंद्रात बॅडमिंटनचे मैदान आणि व्यायामशाळा होती. त्यामुळे हा संपूर्ण परिसर कोयनानगरच्या सामाजिक जीवनाचा आत्मा बनला होता. या पार्श्वभूमीवर कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी सकारात्मक भूमिका घेऊन या केंद्रांचा संपूर्ण ‘लूक’ बदलावा, अशी मागणी होत आहे. केवळ दुरुस्ती नव्हे, तर आधुनिक सुविधा, आकर्षक रचना आणि नव्या पिढीला साद घालणारे उपक्रम राबवून या परिसराला नवसंजीवनी देणे गरजेचे आहे.आता निर्णयाची वेळ आली आहे. कोयनानगरचा हा सांस्कृतिक वारसा जपायचा की इतिहासाच्या पानांमध्ये हरवू द्यायचा. केवळ आठवणी उरल्या मात्र काळाच्या ओघात या दोन्ही केंद्रांकडे दुर्लक्ष झाले. देखभालीअभावी इमारती जीर्ण झाल्या, सुविधा कालबाह्य झाल्या आणि उपक्रम थांबले. आज या ठिकाणी शांतता पसरली असून, एकेकाळच्या गजबजाटाच्या केवळ आठवणी उरल्या आहेत.स्थानिक नागरिकांच्या भावनांमध्ये वेदना स्पष्ट जाणवते. ही ठिकाणे आमच्या आयुष्याचा भाग होती. पण आज तीच ओस पडलेली पाहून मन हेलावते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.