Axar Patel Injury : नागपूरमध्ये भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला गंभीर दुखापत, पुढील सामन्यात खेळण्याबाबत सस्पेन्स
Axar Patel Injury : या सामन्यादरम्यान स्टार भारतीय अष्टपैलू खेळाडूला दुखापत झाली. त्याच्या बोटाला चेंडू लागल्याने गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

Axar Patel Injury in IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला नागपुरात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेची दणक्यात सुरुवात करत १-० अशी आघाडी घेतली आहे. मात्र, या विजयानं जेवढा आनंद दिला, तेवढीच काळजी अक्षर पटेलच्या दुखापतीने वाढवली आहे.
अभिषेक शर्माचं वादळ अन् भारताचा विक्रमी स्कोअर –
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, हा निर्णय भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. सलामीवीर अभिषेक शर्माने पुन्हा एकदा आपल्या बॅटने आग ओकली. त्याने अवघ्या ३५ चेंडूत ८४ धावांची तुफानी खेळी केली. कर्णधार सूर्याने ३२ धावांचे योगदान दिले, तर हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंग यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्यामुळे भारताने २० ओव्हरमध्ये ७ बाद २३८ धावांचा डोंगर उभा केला. हा न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा सर्वोच्च टी-२० स्कोअर ठरला.
किवी संघाचा लढा अपयशी –
प्रत्युत्तरात २३९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. ग्लेन फिलिप्सने ४० चेंडूत ७८ धावा करत झुंज दिली, पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडला १९० धावांवर रोखले आणि सामना ४८ धावांनी खिशात घातला.
अक्षर पटेल जखमी; वर्ल्ड कपचं टेन्शन वाढलं –
विजयाच्या जल्लोषात टीम इंडियासाठी एक चिंतेची बातमी समोर आली. न्यूझीलंडच्या डावातील १६ व्या षटकात डॅरिल मिचेलचा एक वेगवान शॉट अडवताना ऑलराउंडर अक्षर पटेलच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. चेंडू इतक्या वेगाने लागला की अक्षरच्या बोटातून रक्त येऊ लागले आणि तो वेदनेने विव्हळताना दिसला.
हेही वाचा – मोठी बातमी! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग! अखेर टी-२० विश्वचषकातून घेतली माघार
त्याला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आले असून त्याचे उरलेले षटक अभिषेक शर्माने पूर्ण केले. ७ फेब्रुवारीपासून टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. अशा वेळी मुख्य फिरकीपटू अक्षर पटेल जखमी होणे हे कर्णधार सूर्या आणि प्रशिक्षकांसाठी डोकेदुखी ठरू शकते.






