Sourav Ganguly : दादाची नवी इनिंग! सौरव गांगुली पहिल्यांदाच सांभाळणार ‘या’ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी

Sourav Ganguly Appointed Head Coach : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीगच्या आगामी २०२६ हंगामापूर्वी गांगुली यांची प्रिटोरिया कॅपिटल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गांगुली प्रथमच कोणत्याही क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
जोनाथन ट्रॉटने दिला राजीनामा –
शनिवारी इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट यांनी प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रविवारी गांगुली यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. ट्रॉट यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने २०२५ हंगामात निराशाजनक कामगिरी केली होती. संघाला १० साखळी सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकता आल्याने संघ नॉकआउट फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला आणि सहा संघांच्या T20 लीगच्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर राहिला. यामुळे जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सने हा बदल घडवून आणला.
सौरव गांगुली पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत –
🚨Dada takes charge in SA20! @SGanguly99 is now the new head coach of the Pretoria Capitals.🏏#SouravGanguly pic.twitter.com/bUJgCvDG91
— 100MB (@100MasterBlastr) August 24, 2025
सेंच्युरियनस्थित प्रिटोरिया कॅपिटल्स या फ्रँचायझीने इन्स्टाग्रामवर सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा केली. यासोबतच, गांगुली यांच्यासाठी ही पहिलीच मुख्य प्रशिक्षकाची भूमिका असेल. यापूर्वी २०१८ आणि २०१९ मध्ये गांगुली यांनी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक म्हणून काम केले होते. तसेच, २०१५ ते २०१९ या काळात ते बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. २०१९ मध्ये त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावली होती, परंतु बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी सोडली.
हेही वाचा – Cheteshwar Pujara Retirement : ‘…म्हणून क्रिकेटला अलविदा केला’, चेतेश्वर पुजाराने निवृत्तीबद्दल केला खुलासा
SA20 मध्ये भारतीय खेळाडूंचा सहभाग –
गेल्या वर्षी गांगुली यांची जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती झाली होती. प्रिटोरिया कॅपिटल्सचा मालकी हक्क जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सकडे आहे, जे दिल्ली कॅपिटल्सची सह-मालक आहे. SA20 लीगमध्ये यापूर्वी दिनेश कार्तिक हा पहिला भारतीय खेळाडू म्हणून पार्ल रॉयल्सकडून खेळला आहे. यंदा १३ अन्य भारतीय खेळाडूंनी या लीगसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये पीयूष चावला, सिद्धार्थ कौल, अंकित राजपूत, सारुल कंवर, अनुरीत सिंह कथूरिया, अन्सारी मारूफ, महेश अहीर, निखिल जग्गा, मोहम्मद फैद, केएस नवीन, इम्रान खान, वेंकटेश गलीपेली आणि अतुल यादव यांचा समावेश आहे.





