Someshwar Sugar Factory Election: राष्ट्रवादीची एकहाती सत्ता की मोठा धक्का? सोमेश्वरसाठी मैदानात उतरले ६०१ उमेदवार
Someshwar Sugar Factory Election: बारामतीत प्रशासकीय भवनाबाहेर उमेदवारांचे मोठे शक्तीप्रदर्शन; आजी-माजी पदाधिकारी आणि दिग्गज नेते मैदानात.

Someshwar Sugar Factory Election – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी सोमेश्वर कारखान्याची ही पहिलीच निवडणूक असल्याने राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
महायुती व महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती येथील प्रशासकीय भवन परिसरात सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले,
तर काही उमेदवारांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र आणि सुमारे २७ हजार सभासद असलेल्या या कारखान्यावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता राहिली आहे. मात्र, यंदा राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भाजप, शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरल्याने सामना बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.
दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल –
प्रमुख अर्जदारांमध्ये विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप, शेतकरी नेते सतीशराव काकडे, माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषद माजी सभापती प्रमोद काकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, बारामती तालुका राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष राजेंद्र जगताप, नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे, माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, किसन तांबे यांसह विविध आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि सोसायटी चेअरमन यांचा समावेश आहे.





