Soldier Land Encroachment : जवानाच्या शेतजमिनीत बांधली स्मशानभूमी! ग्रामपंचायतीचा धक्कादायक कारनामा; नक्की काय घडलंय?
Soldier Land Encroachment : जवानाच्या हक्काच्या जमिनीवर ग्रामपंचायतीचा घाला; गट क्रमांक ५२० मधील बेकायदा बांधकाम पाडण्याची कुटुंबाची मागणी.

Soldier Land Encroachment – कोणत्याही गावासाठी स्मशानभूमी ही अत्यावश्यक बाब आहे. मात्र, ती उभारताना ग्रामपंचायतीने जवान बाळकृष्ण नाना भोसले यांच्या शेतजमिनीत ती बेकायदा उभारली आहे. त्यामुळे याची चौकशी करुन आमच्या कुटुंबाच्या शेतजमिनीत केलेले स्मशानभूमीचे बांधकाम पाडावे व ती ग्रामपंचायतीच्या 519 गटातील जागेत उभारावी, अशी मागणी जवानाचे भाऊ दत्ता नाना भोसले यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खर्शी, ता. जावळी येथील ग्रामपंचायतीने खर्शी गावच्या हद्दीतील गट क्रमांक 520 मध्ये स्मशानभूमी उभारली आहे. मात्र, या गट क्रमांकात जवान भोसले यांच्या कुटुंबाची शेतजमीन आहे. ही स्मशानभूमी उभी करताना जवान भोसले यांच्या कुटुंबीयांना कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही. बांधकाम करण्यासाठी योग्य परवानगी घेतली गेलेली नाही. यामुळे तिथे शेतजमीन कसताना जवान भोसले यांच्या कुटुंबांना अडचण निर्माण झाली आहे.
याबाबत जवान भोसले यांचे बंधू दत्ता भोसले यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीने आमच्या 520 गट क्रमांकात ही स्मशानभूमी उभारली असून याबाबत आम्ही तहसील प्रशासनाकडे दाद मागितली आहे. ग्रामपंचायतीने तहसील कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केले व तहसील कार्यालयास जमीन अधिग्रहण करण्याबाबत मागणी केलेली आहे. मात्र, तहसील कार्यालयाने ग्रामपंचायतीस अशा प्रकारे जागा अधिग्रहण करता येत नाही असे कळवले आहे.
ग्रामपंचायतीने आमच्या 520 गट क्रमांकात बेकायदा उभारलेली स्मशानभूमी शेड पाडावे व ते ग्रामपंचायतीच्या 519 गट क्रमाकांत उभारावे, अशी आमची ठाम मागणी आहे. तसेच आमच्या शेतजमिनीत ज्या प्रकारे कोणतीही परवानगी न घेता स्मशानभूमी बांधकाम केल्याप्रकरणी चौकशी करुन सरपंच, उपसरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व आमच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा.
ग्रामस्थांमध्येही नाराजी
दरम्यान, ग्रामस्थांमध्येही या निर्णयाविरोधात नाराजी पसरली असून, प्रशासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. स्थानिकांनी सांगितले की, गावात इतर पर्यायी जागा उपलब्ध असताना अशा पद्धतीने शेतजमिनीवर स्मशानभूमी उभारणे अयोग्य आहे. याप्रकरणी तहसील व ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी वाढत्या विरोधामुळे हा विषय चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. संबंधित जवानाच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






