Shirur Crime: शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती राजेंद्र दळवी (वय ३८, रा. चांडोह, सालकरमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास संबंधित शेतजमिनीत विश्वास चंद्रकांत सालकर हा ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना फिर्यादी व त्यांच्या जाऊ प्रियांका दत्तात्रय दळवी यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर आरोपींसह इतरांनी घटनास्थळी येऊन दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आवाज ऐकून फिर्यादींच्या कुटुंबातील दत्तात्रय बबन दळवी, कार्तिक राजेंद्र दळवी, अनिता पोपट दळवी, सुमन दादाभाऊ दळवी, दादाभाऊ राघू दळवी व बिजली पोपट दळवी हे तेथे आले असता आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या गोंधळात सुमन दादाभाऊ दळवी व प्रियांका दत्तात्रय दळवी यांच्या गळ्यातील प्रत्येकी अर्धा तोळ्याचे मनीमंगळसूत्र तुटून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्वास चंद्रकांत सालकर, जयहिंद चंद्रकांत सालकर, स्वप्नील सूर्यभान सालकर, संजय बाळू सालकर, राजेंद्र बाळू सालकर, मंदाबाई चंद्रकांत सालकर, प्रिती जयहिंद सालकर, चंद्रकांत सखाराम सालकर व अविनाश सूर्यभान सालकर (सर्व रा. चांडोह, सालकरमळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वादाचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.