पुणे जिल्हा | बेलसर फाटा येथे डुकरांची कत्तल

बेलसर, (वार्ताहर)- बेलसर-साकुर्डे (ता.पुरंदर) गावाच्या शिवेवर बेलसर फाटा येथे मोठ्या प्रमाणात हॉटेलचा कचरा, मृत कोंबड्या व देवदेवतांच्या नावाखाली होत असलेल्या डुकरांच्या कत्तली यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. ग्रामस्थांतून याबाबत मोठा असंतोष व्यक्त होत आहे.
बेलसर फाटा येथे बुधवार (दी.22) रोजी 10 वाजण्याच्या सुमारास काही महिला व पुरुष एकत्र येऊन देवदेवतांच्या नावा खाली मोठ्या प्रमाणात जिवंत डुक्कर जाळुन पार्ट्या करताना बेलसर ग्रामस्थांना आढळून आले. राजरोसपणे रस्त्याच्या कडेला सुरु असणारा हाअघोरी प्रकार पाहून बेलसर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हा प्रकार बंद करन्यास भाग पाडले. पोलीस प्रशासनाला पाचारण करुन 12 जिवंत डुक्करांची सुटका करण्यात आली.
बुधवारी (दि.22) पॅगो अँपे गाडीमध्ये (एमएच 12 एमव्ही 6241) सुमारे 15 डुक्करे पार्टीसाठी आल्याचे ग्रामस्थांना कळाले. बेलसर व साकुर्डे गावातील ग्रामस्थ बेलसर फाट्यावर मोठ्या प्रमाणात जमा झाले. आक्रमक ग्रामस्थांनी तेथे आलेल्या महिला पुरुष लहान मुळे या हा प्रकार बंद करण्यास सांगितले पोलीस प्रशासनास संपर्क साधून झालेला प्रकार सांगितला. यानंतर पोलीसही घटना स्थळी दाखल झाले.
आक्रमक ग्रामस्थांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेतला होता परंतु पोलीस आल्याने रस्ता सुरळीत चालू करण्यात आला. आक्रमक ग्रामस्थांकडून, डुक्कर व संबंधित व्यक्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. पुढील तपास व कारवाई जेजुरी पोलीस करीत आहेत.
यावेळी बेलसर गावाचे सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच चंद्रकांत हिंगणे, पोलीस पाटील पायल राऊत, माजी उपसरपंच धीरज जगताप, कैलास जगताप, संभाजी गरुड, हेमंत जगताप, अनिल गरुड, तुषार कुदळे, निलेश भोईटे, संतोष जगताप, सचिन फंड, समीर मुजावर, कांतीलाल भोंगळे तसेच युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
अनेक दिवसांपासून बेलसर फाटा नजीक असलेल्या ओढ्यामध्ये सर्रास जिवंत डुक्करांना जाळून मोठ्या प्रमाणात पार्ट्या सुरू असल्याचे आढळून आले होते. याबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली होती येणार्या जाणार्या नागरिकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच परिसरात आरोग्याचा मोठा प्रश्न समोर आला होता.





