पुणे जिल्हा | बेलसर ग्रामपंचाय आगीत भस्मसात

बेलसर, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील चावडी चौकात असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाला बुधवारी (दि. 31) सकाळी 10च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागून इमारतीचे व आतील कागदपत्रांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे.
सुदैवाने इमारतीमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर या आगीमध्ये जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयातून मोठ्या प्रमाणावरती आगीचे, धुराचे लोट बाहेर येत होते. आगीची तीव्रता पाहुन जेजुरी, सासवड येथील अग्निशमनदलाला पाचरण केले.
प्रथमदर्शनी ही आग विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती पंचनाम्यात देण्यात आली आहे. याच कालावधीमध्ये नागरिकांनी आगीचे कारण अस्पष्ट असल्याने तातडीने महावितरण संपर्क साधून वीजपुरवठा खंडित केला.
इमारत पूर्णपणे जुन्या मांडणीची असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सागवानी लाकूड, कौल व पत्र्याचा वापर केला होता.
यामुळे संपूर्ण इमारतीचा आतील भाग जळाला असून यामध्ये कागदपत्रांसह, फर्निचर, कपाटे, संगणक व इतर साहित्य सर्व जळून खाक झाले आहेत. या संदर्भात जेजुरी पोलीस ठाण्यात सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच चंद्रकांत हिंगणे यांनी खबर दिली असून पुढील तपास जेजुरी पोलीस ठाणे करीत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पुरंदर तालुक्याच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केले तर यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम लहामटे, विस्तार अधिकारी महादेव कांबळे, सुहास डोळस,शिवरी विभागाचे मंडलाधिकारी बापूसाहेब देवकर यांनी पंचनामा केला.
ग्रामपंचायतीला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले असून कागदपत्रे जळाल्याने नागरीकांची गैरसोय होईल यातून पुन्हा नव्याने सर्व उभे करताना थोडा वेळ लागणार आहे. -अविनाश निगडे, ग्रामविकास अधिकारी बेलसर.
अचानक आग लागल्याने मोठी झाली तरी पण आम्ही ग्रामस्थांच्या मदतीने जास्तीत जास्त कागदपत्रे वाचवण्यात यशस्वी झालो असून यापुढील काळात ग्रामपंचायतच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तर यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण पदाधिकारी काळजी घेऊ व या ठिकाणी लवकरात लवकर सुसज्ज नवीन इमारत व्हावी यासाठी प्रशासनास तातडीने प्रस्ताव दिला असून त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू .
– धीरज जगताप , विद्यमान सदस्य, माजी उपसरपंच बेलसर.





