पुणे जिल्हा | पुरंदरच्या पश्चिमेकडील पावसाने खळदकर धास्तावले

बेलसर, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यामध्ये पश्चिम भागात कानिफनाथ डोंगर, बापदेव परिसर, चतु्रमुख परिसर व अन्य भागात शनिवार ता.17 रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे क-हा नदीला महापूर आला व याने खळदकरांची चांगलीच झोप उडाली व येथील गावठाणातील नागरिकांना भीतीच्या छायेखाली वावरत मध्यरात्री पासून जागेच राहावे लागले
या भागात 25 सप्टेंबर 2019मध्ये या भागात असाच रात्रीच्या वेळी महापूर आल्याने संपूर्ण गावांमध्ये पाणी शिरले होते, धास्तावलेल्या नागरिकांना गाव सोडून वाड्यावस्तीवरती स्थलांतरित व्हावे लागले होते.
यावेळी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली होती तेव्हापासून प्रत्येक पावसाळ्यातील नागरिक हे जागरण करीत आहेत.
शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे रविवारी पहाटे अशा प्रकारचा अचानक महापूर नदीला आला व पाण्याच्या आवाजाने संपूर्ण गाव धास्तावले, सर्वजण पुन्हा एकदा गावात पाणी शिरते की काय या भीतीने हादरून गेले होते.
अचानक बघताबघता दशक्रिया विधी घाट, स्मशानभूमी घाट इथपर्यंत पाणी पोहोचले. खळद ते एखतपूर मुंजवडी परिसराला जोडणारा क-हानदीवरील पूल, खंडोबाची वाडी रस्ता पाण्याखाली गेला. सुदैवाने नागरिकांना पाण्याची कल्पना मिळाल्याने पहाटेपासून नागरिकांनी काळजी घेतली यामुळे कोणताही अनर्थ झाला नाही.तर सकाळी पाणी ओसरण्यास सुरूवात झाली.
माळीण, ईशाळवाडीची भीती
खळद येथील गावठाण भाग हा क-हानदीच्या पात्रालघत 30 ते 35 फूट उंची वरती असून दिवसेंदिवस येणार्या महापुराच्या पाण्यामुळे नदीच्या पात्राचा विस्तार होत असून एक दिवस माळीण,
ईशाळवाडी सारखी घटना घडत संपूर्ण गाव वाहून जाते की काय अशी भीती येथील नागरिकांच्या मनामध्ये बसली असून 2019 पासून गावालगत संरक्षण भिंत व्हावी यासाठी येथील नागरिक पाठपुरावा करत आहेत; मात्र अद्याप पर्यंत या झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आली नाही.





