पुणे जिल्हा | आम्हाला कोणाची भीती नाही- अजित पवार

बेलसर (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण साधेपणाने कार्यक्रम करायचा होता. म्हणून कोठे मंडप व्यवस्था केली नाही, पुन्हा चर्चा नको की कोणाची भीती वगैरे होती का? आम्हाला कोणाची भीती नाही आणि आम्ही भीतीला भीक पण घालत नाही.
लवकरात लवकर ही सेवा आम्हाला आमच्या पुरंदरवासी यांना देता यावी म्हणून ही घाई गडबड करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील तालुकास्तरीय प्रशासकीय इमारत 2019 मध्ये उद्घाटन करून लगतच्या काही वर्षात पूर्ण झाली; परंतु श्रेयवादाच्या भोवर्यात ही इमारत अडकली होती.
सोमवारी (दि.26) या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला मुहूर्त मिळाला असून उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे,मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे,
सा. बा. उपविभागीय स्वाती दहिवाल , तहसीलदार विक्रम राजपुत,दिगंबर दुर्गाडे, विजय शिवतारे,दिलीप यादव, बबू माहूरकर, सुदाम इंगळे, माणिक झेंडे,निलेश जगताप, जालिंदर कामठे, अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, दत्तात्रय झुरंगे, रमेश इंगळे, सुनीता कोलते,अभिजित जगताप, हरिभाऊ लोळे आदि मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, सासवड येथील जुनीप्रशासकीय इमारत ही वापरणे योग्य नाही, तर तिथे लिकेज होत आहे, नवीन इमारत तर पूर्ण झाली आहे आणि फर्निचर पण झाले आहे. त्याचे उद्घाटन करण्याची गरज आहे.
या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र असताना यावर विचार केला. पुढच्या महिन्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागेल आणि त्या संदर्भात आमच्या दौरे चालू आहेत.
राज्य सरकारच्या विविध योजनांच्या बाबतीत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन विविध कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेत आहोत.
त्यामुळे हा लोकार्पण सोहळा आयोजित केला असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.कोणताही आग्रह न करता, कोणतीही पत्रिका आणि मोठा सोहळा न करता करण्याचा निर्णय आम्ही घेतला. सर्वसामान्य नागरिकांना सोईस्कर व्हावे यासाठी ही घाई गडबड करण्यात आली आहे.
अर्थात काही त्रुटी यामध्ये राहिले आहेत त्या पुढील काळात लवकरच पूर्ण होतील. लोकाभिमुक कारभार करायचा आहे.
सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून सर्व अधिकार्यांनी येणार्या नागरिकांची वागले पाहिजे नागरिकांना हेलपाटे न मारायला लावणे जे काम होणार नाही ते स्पष्टपणे होणार नाही, असे सांगावे असे पवार यांनी अधिकार्यांना यावेळी खडसावले.
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
अचानक लोकार्पण सोहळा आयोजित करुन देखील पुरंदर तालुक्यातील सर्वपक्षीय मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.





