Pune District : राजगुरुनगरात साडेसहा तास जल्लोष
Pune District : राजगुरुनगरसह चाकण, आळंदी आणि तालुक्यातील विविध गावांमध्ये बारा दिवसांच्या गणेशोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राजगुरूनगर : राजगुरुनगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष तब्बल साडेसहा तास रंगला. चित्ररथ, जिवंत देखावे, ढोल-ताशे, डीजे, डॉल्बी, तरुण-तरुणींचे नृत्य तसेच गुलाल-भंडार्याची उधळण अशा उत्साहपूर्ण वातावरणात मानाच्या 18 गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. शेवटच्या गणेशमूर्तीचे रात्री पावणे एकच्या सुमारास विसर्जन झाले.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर 8 पोलीस अधिकारी, 80 पोलीस कर्मचारी, 35 होमगार्ड आणि 200 स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या डीजे आणि लेझर लाईट वापरावरील आदेशाच्या पार्श्वभूमीवर काही मंडळांनी डीजे व लेझर लाईटचा वापर केला, तर अनेक मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करीत पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढली.
राजगुरुनगरसह चाकण, आळंदी आणि तालुक्यातील विविध गावांमध्ये बारा दिवसांच्या गणेशोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मंडळांनी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे घेतली, तर काहींनी जिवंत देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई आणि आरास केली. यंदा राजगुरुनगर शहरातील उंच गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरल्या.
शुक्रवारी (दि. 25) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हुतात्मा स्मृतिशिल्पापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, राजगुरुनगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, नगरसेवक तसेच गणेश मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.
सायंकाळी साडेसहा वाजता मानाच्या मोती चौक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर माणिक चौक, आझाद चौक, गणेश चौक, नवयुग, संत सावतामाळी, अहिल्यादेवी, सरदार चौक, सम्राट उत्कर्ष, सिद्धेश्वर, भारतरत्न लालबहादूर शास्त्री, सिद्धिविनायक, क्रांतीवीर राजगुरू, हुतात्मा राजगुरू, जुना मोटार स्टँड, योगेश्वर आणि एकविरा या मानाच्या गणेश मंडळांनी सहभाग घेतला.
मूर्तीदान उपक्रमाला प्रतिसाद
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मूर्तीदान उपक्रमाला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक भाविकांनी गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित न करता दान केल्या. खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 190 नोंदणीकृत गणेश मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी राजगुरुनगर शहरातील 58 मंडळांची नोंदणी झाली होती. युवक, युवती आणि महिलांनी डीजे तसेच पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करत उत्साहात गणरायाला निरोप दिला.





