Sinhagad Road Traffic: वाहतूक कोंडीवरून महापौर कडाडल्या! पोलिसांना १५ दिवसांत सर्व्हे अहवाल सादर करण्याचे आदेश
Sinhagad Road Traffic: सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात लोकप्रतिनिधी अन् पोलिसांची महत्त्वाची बैठक; धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी परिसरातील कोंडीवर उपाययोजनांची मागणी.

Sinhagad Road Traffic – सिंहगड रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजूषा नागपुरे यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव तसेच दांडेकर पुलापर्यंतच्या मुख्य व पर्यायी रस्ते तसेच चौकांचे १५ दिवसांच्या आत सर्वेक्षण करून अहवाल महापालिकेला सादर करण्याचे निर्देश दिले. अहवालानुसार वाहतूक वॉर्डनची नियुक्ती, आवश्यक उपाययोजना आणि कोंडी कमी करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात येईल.
तोपर्यंत मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलीस, वॉर्डनची संख्या वाढविण्याचे आदेशही त्यांनी दिले. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीस प्रभाग समिती अध्यक्ष सचिन मोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुवंर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक सुनील गवळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियंका गोरे, सचिन पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते काका चव्हाण, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप तसेच परिसरातील नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
यावेळी लोकप्रतिनिधींनी धायरीतील उंबऱ्या गणपती चौकापासून दांडेकर पुलापर्यंत सकाळ-सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस अनुपस्थित असल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे कोंडीत भर पडत असून, वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली.
“पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का?
संतापलेल्या महापौरांनी कोंडीच्या वेळी पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत, असणारे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाईत व्यस्त असतात असे नमूद केले. रस्त्यांवर कार्यक्रम, मिरवणूकीसाठी परवानगी देताना वाहतूक आणि ध्वनीप्रदूषणाचा पुरेसा विचार केला जात नसल्याने नागरिकांचा रोष लोकप्रतिनिधींना सहन करावा लागतो. पोलिसांची काहीच जबाबदारी आहे की नाही,
असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नगरसेवकांनी प्रत्येक चौकात वर्दळीच्या वेळी वाहतूक पोलीस तैनात करणे, पोलीस व पालिकेने संयुक्त अतिक्रमण कारवाई करणे, अनधिकृत पार्किंग रोखणे, खड्डे बुजविणे, अडथळा ठरणारे डीपी व ओव्हरहेड केबल हटविणे आणि कोंडीस कारणीभूत ठरणारे बसथांबे हलविण्याची मागणी केली.
“महापालिका वाहतूक पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असून, सर्वेक्षण अहवालानुसार आवश्यक ती सर्व कामे तातडीने करण्यात येतील. मात्र, तोपर्यंत तातडीनं प्रत्येक चौकात पोलीस, वार्डन नेमावे.”
– मंजुषा नागपुरे ( महापौर, पुणे महापालिका.)






