Alandi Police: पिंपरी-चिंचवड पोलिसांत खळबळ; ‘त्या’ व्हिडिओमुळे वाहतूक पोलीस अडचणीत…घटना कॅमेऱ्यात कैद
Alandi Police: सोशल मीडियावर व्हिडिओ वेगाने पसरल्यानंतर नागरिकांकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सखोल तपासाची मागणी.

Alandi Police – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आळंदी परिसरात कार्यरत असलेल्या एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला एका वाहनचालकाशी पैशांची देवाणघेवाण होत असल्याचे या व्हिडिओत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित कर्मचारी रस्त्याच्या बाजूला उभा असल्याचे दिसते.
त्याच्याजवळ आलेल्या एका वाहनचालकाशी काही संवाद झाल्यानंतर पैशांची देवाणघेवाण झाल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र याबाबत विविध दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार एका अज्ञात व्यक्तीने दूरून मोबाइलमध्ये चित्रित केल्याचे बोलले जात आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झाला.
सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओतील दृश्यांची सत्यता तपासावी. संबंधित कर्मचाऱ्याची भूमिका स्पष्ट करावी. तसेच दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची कशी दखल घेतात आणि पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
“संबंधित कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आमच्याकडे आला आहे. या व्हिडिओची सत्यतात पडताळण्यात येत आहे. जर संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
– विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा





