Singapore Open 2024 : सिंधूच्या पदरी पुन्हा निराशा, दुसऱ्या फेरीतील पराभवासह स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…

Singapore Open 2024 badminton : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूची सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी मोहीम कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मारिनकडून (PV Sindhu vs Carolina Marin) पराभवाने संपुष्टात आली. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सिंधूला महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत (Round of 16 match) गुरुवारी पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यात एकवेळ, सिंधूने मारिनविरुद्ध 18-15 अशी आघाडी घेतली असली तरी भारतीय खेळाडूला ही लय कायम ठेवता आली नाही.
गेल्या आठवड्यात थायलंड ओपनमध्ये उपविजेती ठरलेल्या सिंधूला एक तास आठ मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-13, 11-20, 20-22 असा पराभव पत्करावा लागला. डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीत झालेल्या वादानंतर हे दोन्ही खेळाडू सात महिन्यांत प्रथमच एकमेकांसमोर होते.
पहिला गेम गमावल्यानंतर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मारिनने शानदार पुनरागमन करत सलग सहा गुण मिळवत 17-7 अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूला पुनरागमनाची संधी न देत तिने सामना निर्णायक गेममध्ये नेला.
निर्णायक गेममध्ये जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 12व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने 14-10 अशी आघाडी घेतली होती. मात्र चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मरिनने सिंधूविरुद्ध पुन्हा पलटवार करत सिंधूच्या छोट्या चुकांचा फायदा घेत 22-20 असा गेम जिंकला आणि अशाप्रकारे मरिनने सिंधूवर पुन्हा एकदा विजयाची नोंद केली.
दोन शटलर्समध्ये आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले आहेत ज्यात मारिनचा वरचष्मा राहिला आहे. सिंधूने 6 वेळा स्पॅनिश शटलरचा पराभव केला आहे, तर मरिनने 12 वेळा विजय संपादन केला आहे.





