सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

Saina Nehwal and Parupalli Kashyap | भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप दोघेही विभक्त झाले आहेत. सायनाने काल रात्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पती पारुपल्लीपासून घटस्फोट घेतल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. 2018 साली सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचे लग्न झाले होते. त्यानंतर 7 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
सायनाने पोस्ट करत लिहिले की, “आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जातं. खूप विचारविनिमय केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, विकास आणि मानसिकरित्या स्वस्थ राहण्याला प्राथमिकता देत आहोत. या प्रवासात पुढे जाताना मी चांगल्या शुभेच्छा देत सर्व छान आठवणींसाठी आभार मानते.”

सायना पुढे म्हणाली, “आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कृतज्ञ आहे. यावेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.” सध्या सायनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांनी एकत्र बॅडमिंटनचे धडे गिरवले आहेत. दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत झाली. यादरम्यान त्यांची त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही १४ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केलं.
सायना नेहवाल कारकीर्द
सायना नेहवाल ही भारतीय बॅडमिंटनचा प्रमुख चेहरा मानली जाते. तिने हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद अकादममधून करीयरची सुरुवात केली आहे. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. सायना BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू आहे.
सायनाने 2009 मध्ये इंडोनेशिया ओपनचे जेतेपद मिळवले होते. 35 वर्षीय सायना नेहवालला 2009-10 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2010 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभुषण या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा :
ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?





