Maharashtra Politics : भाजपला राज्यात मोठा धक्का; बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
Maharashtra Politics : एकीकडे मुंबई आणि दिल्लीच्या पातळीवर महायुतीकडून विरोधी पक्षांना खिंडार पाडण्याच्या हालचाली सुरू असतानाच, दुसरीकडे कोकणातील भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोठा पलटवार केला आहे.

Maharashtra Politics : कोकणातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून भाजपला वैभववाडी तालुक्यात धक्का बसला आहे. मंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघातील नेर्ले गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक ग्रामस्थांनी ठाकरे गटात प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)
प्रवेशकर्त्यांचे भगवी शाल परिधान करून स्वागत करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होत असताना, आता नितेश राणे यांच्या मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाने ठाकरे गटाची वाट धरल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Politics)
नेर्ले गावातील या प्रवेशामुळे वैभववाडी परिसरात ठाकरे गटाचे संघटन अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षप्रवेशावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही सांगण्यात आले. (Maharashtra Politics)
कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra Politics)





