Baramati News : बारामती शहरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अन्यथा..; भाजप युवा मोर्चाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
बारामती शहराची (Baramati News) वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक, नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्हाच्या वतीने करण्यात आली आहे.

Baramati News : बारामती शहराची (Baramati News) वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक, नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्हाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन (Baramati News) तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बारामती शहराचा झपाट्याने विस्तार होत असून शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने तसेच संवेदनशील भागांमध्ये नागरिकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे.
अशा परिस्थितीत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही काळाची गरज बनली आहे.सध्या शहरातील काही भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असले तरी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध नाही.
चोरी, लूटमार, महिलांवरील अत्याचार, वाहतूक नियमांचे उल्लंघन, संशयास्पद हालचाली आणि इतर गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी ठरत आहे. यामुळे पोलिस प्रशासनाला गुन्ह्यांचा तपास करणे, आरोपींचा शोध घेणे तसेच गुन्हे रोखण्यास मोठी मदत होते.
भाजप युवा मोर्चाने नगर परिषदेकडे शहरातील सर्व प्रमुख चौक, व्यापारी संकुले, बसस्थानक परिसर, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणी तातडीने नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यमान कॅमेऱ्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती करून ते २४ तास कार्यरत राहतील याची दक्षता घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा दक्षिण अध्यक्ष वैभव सोलनकर म्हणाले की, “बारामती शहराच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करता कामा नये. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने उभारण्यात यावी.
शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जर या मागणीबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, तर भाजप युवा मोर्चा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारेल आणि नगर परिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेईल.”
यावेळी (Baramati News) भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर, बारामती शहराध्यक्ष अभिषेक चिंचकर, तालुकाध्यक्ष जगदीश कोळेकर, पुणे जिल्हा दक्षिण सरचिटणीस विवेक साळुंके, उपाध्यक्ष हर्षद जगदाळे, संदीप केसकर, रोहित शिंदे, रघू चौधर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






