मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता.आंबेगाव) येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये गेल्या २ वर्षात ठेवीमध्ये भरघोस वाढ झाली आहे. पतसंस्थेने नेहमीच विधायक आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य दिल्यामुळे पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास वाढला आहे, असे मत पतसंस्थेचे अध्यक्ष यतीनकुमार हुले यांनी व्यक्त केले. संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची चोविसावी वार्षिक सभा मंचर (ता.आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात संपन्न झाली. अॅड. महेंद्र खरात यांनी उपस्थित सभासदांना पतसंस्थेचे नियम आणि हक्क याबाबत मार्गदर्शन केले. शरद बँकेचे संचालक अजय घुले, हिरामण भोर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पोखरकर यांनी संस्थेच्या 2023-24 या वर्षाचे आर्थिक पत्रकांचे वाचन केले. संस्थेमध्ये ३६ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी असून स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ असल्याची माहिती दिली. आर्थिक पत्रकांवर चर्चा करताना संस्थेचे जेष्ठ सभासद भास्कर लोंढे, सुनील शेटे, चित्तरंजन कोरे, विठ्ठल महामुनी यांनी आपले विचार मांडले. संस्थेने सभासदांना ११.५ टक्के लाभांश जाहीर केला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष इंजि.यतीनकुमार हुले यांनी संस्था रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना या वर्षात आरोग्य शिबीर, व्याख्यानमाला, जेष्ठ सभासदांचे सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. पतसंस्थेचे काही थकीत कर्जदार संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम मिळाली नाही. अशा प्रकारचे आरोप समाज माध्यमांद्वारे करत आहेत. तक्रारदारांनी संस्थेच्या केलेल्या बद्नामीमुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा. असा ठराव सुनील भालेराव यांनी मांडला व संमत केला. संस्थेची कर्ज वाटप कार्यपद्धती योग्य असल्याबाबत सभासद मंगेश रागमहले, मंगेश करंडे, बाबाजी करंडे यांनी सांगितले. संस्थेचे संचालक अशोक करंडे, नवनाथ बाणखेले, बाळासाहेब घुले, कैलास बांगर, ललिता काळे, वत्सला जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सचिन भालेराव यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष जगदिश घिशे यांनी मानले.