Pune District: संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह नेणारी रुग्णवाहिका रोखली

मंचर : पुणे-नाशिक हमरस्त्यावरील मंचर जवळील एकलहरे बायपास येथे वारंवार अपघात होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त महिलेचा मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका रोखत रस्ता-रोको आंदोलन शनिवार, दि.७ रोजी सकाळी ११ वाजता करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
पुणे-नाशिक रस्त्यावर एकलहरे गावाजवळ बायपास रस्ता झाल्याने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात गेल्या वर्षभरात आठ ते दहा लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले तसेच १७ ते १८ नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत वारंवार स्थानिक ग्रामस्थ, एकलहरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुणे-नाशिक हायवे अथॉरिटीला पत्र देऊन होणाऱ्या अपघाताची माहिती देऊन उड्डाणपूल किंवा भूमिगत पूल करावा तसेच अपूर्ण साईट पट्ट्या पूर्ण कराव्यात,अपघात होणाऱ्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे.अशी मागणी करूनही हम रस्त्याचे अधिकारी मात्र लक्ष द्यायला तयार नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. महाळुंगे पडवळ येथील महिला आणि तिचा दीर हे दुचाकीवरून महाळुंगे पडवळ येथे जात असताना दुचाकीला एका खाजगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला ठार झाली.
तर दुचाकी स्वार जखमी झाला आहे. संबंधित महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करून रुग्णवाहिकेद्वारे महाळुंगे पडवळ येथे नेत असताना महाळुंगे पडवळ,कळंब,एकलहरे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रुग्णवाहिका अडवून धरत रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने तहसीलदार, नॅशनल हायवेचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यासाठी प्रयत्न करू आणि भूमिगत पूल होण्यासाठी कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी नॅशनल हायवेचे उपअभियंता अरुण चौधरी, यांच्यावर हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, एकलहरेचे माजी सरपंच संतोष डोके, मिलिंद शिंदे,प्रदीप शिंदे, सुदाम बाळाजी पडवळ, देविदास डोके, पोलीस पाटील सुमन फलके, रिना डोके, बाळासाहेब यादव, शिवाजी भालेराव, दीपक चिखले इत्यादींनी प्रश्नांचा भडीमार करत घेराव घातला. अपघाताला नॅशनल हायवेचेच अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. मंचर पोलिसांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेत शांततेचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत मिळालेल्या आश्वासनानुसार ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.त्यानंतर मृतदेह घेवून रुग्णवाहिका महाळुंगे पडवळला रवाना झाली.मंचर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
एकलहरे येथे भूमिगत पूल किंवा उड्डाणपूल होण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना नॅशनल ऍथॉरिटीला केल्या असून त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल. याबाबत लवकरच नॅशनल हायवे अधिकाऱ्यांच्या समावेश बैठक लावली जाईल आणि त्यामधून मार्ग काढला जाईल.
– दिलीप मेदगे, पुणे नाशिक हायवे समन्वयक.





