Pune District: इंजिनियरने दहा गुंठ्यात घेतले शेवंतीचे घेतले यशस्वी उत्पादन

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) येथील इंजिनियर यतीनकुमार हुले यांनी दहा गुंठे क्षेत्रात पॉली हाऊस उभारून डेकोरेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या शेवंती फुलाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. पुण्या, मुंबईच्या मार्केटमध्ये शेवंती फुलांना मागणी आहे. शेवंती फुलांची तोडणी अंतिम टप्प्यात आली असून यातून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये नफा मिळण्याचा अंदाज आहे.
प्रगतीशील शेतकरी यतीनकुमार हुले यांची मंचर धादरादेवीच्या पायथ्याला शेती असून त्यानी १० गुंठे क्षेत्रात सात ते आठ वर्षापूर्वी पॉलिहाऊस उभारले आहे. प्रथम त्यांनी पॉलिहाऊसमध्ये लाल,पिवळी ढोबळी मिरची घेतली होती. मात्र, त्यात म्हणावे असे उत्पादन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी कृषी प्रदर्शनात डेकोरेशनसाठी वापरणाऱ्या शेवंतीच्या विविध प्रकारच्या फुलांची माहिती मिळाली.याबाबत त्यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र येथून मार्गदर्शन घेतले व त्यांच्या दहा गुंठे पॉलिहाऊस क्षेत्रात डेकोरेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या शेवंतीची लागवड केली. सध्या त्यांच्या शेवंती फुलाच्या प्लॉटमध्ये १२ कलरची शेवंती फुले असून प्लॉट साडेतीन महिन्याचा झाला आहे. १० काड्यांची बंडलला आता मार्केटमध्ये २०० ते २५० रुपये बाजार मिळत आहे. फुलांची अंतिम टप्यात तोडणी सुरु असून यातून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळेल. असे हुले यांनी सांगितले.
त्यांची फुले पुणे येथे विक्रीसाठी जात असून लग्न, वाढदिवस, डेकोरेशन, शुभेच्छांसाठी बनवले जाणारे बुके यासाठी या फुलांना अधिक मागणी असते. फुलाची तोडणी झाल्यानंतर त्यांना पाण्यात ठेवले जाते. त्यानंतर दहा फुलांचा (काड्यांचा) एक बंडल करून बॉक्स पॅकिंग करून पुणे येथे पाठवले जाते. शेवंती फुले आठ ते दहा दिवस चांगली राहतात.फुलांची शेती मोठ्या प्रमाणात असल्यास मुंबई मार्केटला देखील चांगल्या प्रकारे विक्री होते, असेही हुले म्हणाले. शेडनेट, पॉलिहाऊस याचा वापर करून उत्तम प्रकारे फुल शेती, फळ शेती करता येऊ शकते. मी पॉलिहाऊसच्या माध्यमातून फूलशेती करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले आहे. त्यासाठी पत्नी सुनीता, वडील गोविंद हुले यांचे सहकार्य लाभले.फूल शेतीसाठी तरुणांनी देखील पुढे यावे काही मार्गदर्शन लागल्यास मी करण्यास तयार आहे. असेही यतीनकुमार हुले म्हणाले.
पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेवंती फुलाला बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे वेगळया पद्धतीने व मार्केटमध्ये मागणी असणाऱ्या शेवंतीच्या विविध प्रकारचे फुलाचे उत्पादन घेतले आहे. आजकाल तरुण शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केल्यास व सामूहिक पद्धतीने शेती केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.
– यतीनकुमार हुले,फूल उत्पादक शेतकरी, मंचर.





