मंचर, (प्रतिनिधी) – इयत्ता १२ वी परीक्षेत आंबेगाव तालुक्यामध्ये वाणिज्य शाखेत घोडेगाव येथील सिद्धी प्रकाश नायकोडी ही विद्यार्थिनी प्रथम आली असून तिने माहिती व तंत्रज्ञान वाणिज्य या विषयात १०० पैकी १०० गुण, मिळविल्याने तिथे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिद्धी ही लांडेवाडी येथील भैरवनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जुनियर कॉलेजमध्ये शिकत होती. सविता खत्री, प्राची गुळवे, कवीता घाटवे, शिला कराळे व प्राचार्य सुनील गावशेटे यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता दहावीमध्ये देखील तिने जनता विद्या मंदिर, घोडेगाव येथे प्रथम क्रमांक मिळविला होता. सिद्धी खूप हुशार व गुणवंत विद्यार्थिनी असून आपल्या मेहनतीने व चिकाटीने तिने अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये देखील तिने भरघोस यश मिळविले आहे. पुढील शिक्षण वाणिज्य शाखेतून पूर्ण करून चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा तिचा निर्धार आहे.
त्यासाठी ती प्रयत्नशील राहणार आहे, असे तिचे वडील प्रकाश नायकोडी यांनी सांगितले. घोडेगाव परिसरातून तिचे खूप कौतुक होत आहे. तिचे सर्व शिक्षक तसेच नातेवाईक यांनी देखील सिद्धीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.