IND vs WI : कर्णधार गिलचा मैदानावर दिसला ‘सुपरमॅन’ अवतार, हवेत सूर मारत पकडला जबरदस्त कॅच, पाहा VIDEO

Shubman Gill Catch Video Viral : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 518 धावांवर डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ पहिल्या डावात केवळ 248 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि त्यांना फॉलोऑनचा सामना करावा लागला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार गिलने क्षेत्ररक्षणात अप्रतिम कामगिरी करत शानदार झेल टिपला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हवेत झेप मारत घेतला अप्रतिम झेल –
वेस्ट इंडीज संघ फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरला तेव्हा तगनारायण चंद्रपॉल आणि जॉन कॅम्पबेल यांनी सावध खेळण्याचा प्रयत्न केला. 17 धावांपर्यंत त्यांनी ही खेळी कायम ठेवली. मात्र, याचवेळी मोहम्मद सिराजच्या एका शॉर्ट बॉलवर चंद्रपॉलने चेंडू जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत उचलला गेला. मिडविकेटवर तीस यार्डच्या आत उभ्या असलेल्या कर्णधार शुबमन गिलने मिडऑफच्या दिशेने धाव घेत हवेत झेप मारली आणि चेंडू अचूकपणे झेलला.
Gravity takes a break! ⚠
Captain @ShubmanGill takes a stunner and @mdsirajofficial gets his wicket. 👏
Catch the LIVE action 👉https://t.co/Gdi0klvyUf#INDvWI 👉 2nd Test, Day 3 | Live Now on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/lvOaACSSpk
— Star Sports (@StarSportsIndia) October 12, 2025
कुलदीप यादवने पहिल्या डावात दाखवला जलवा –
भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावाला तिसऱ्या दिवशी लवकर गुंडाळण्यात भारताला यश आले. दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडीजने चार गडी गमावले होते. तिसऱ्या दिवशी फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या जादुई गोलंदाजीने पाच गडी टिपले. याशिवाय, रवींद्र जडेजाने तीन, तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा पहिला डाव संपुष्टात आणला.
हेही वाचा – Virat Kohli : किंग कोहलीचा सोशल मीडियावरही जलवा! एका इन्स्टा पोस्टमधून करतो कोट्यवधींची कमाई!
मालिकेत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजीने दाखवली ताकद –
तिसऱ्या दिवसअखेर फॉलो-ऑन खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने दोन विकेट्स गमावून 173 धावा केल्या आहेत. संघ अजूनही भारतापेक्षा 97 धावांनी मागे आहे. या कसोटीत किंवा या मालिकेत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजीने आपली ताकद दाखवली आहे. 35 धावांत दोन विकेट्स गमावल्यानंतर, जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी 207 चेंडूत 138 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. कॅम्पबेल 87 आणि होप 66 धावांवर नाबाद आहेत. तेजनारायण चंद्रपॉल 10 धावा काढून सिराजच्या चेंडूवर बाद झाला, तर अॅलिक अथानाझे सात धावा काढून सुंदरचा बळी ठरला.





