Shrirang Barne – लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याबरोबरच उन्हाळ्यात नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या. प्रलंबित कामांचे प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवावेत, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. खासदार बारणे यांनी सोमवारी (दि. २२) तिन्ही नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुनील शेळके, संबंधित नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लोणावळा हे पर्यटननगरी असल्याने भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, नालेसफाई, पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करणे आणि रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच खंडाळ्यातील उड्डाणपुलाच्या डागडुजी आणि सुशोभीकरणाबाबतही एमएसआरडीसीला निर्देश देण्यात आले आहेत. वडगावमध्ये पोटोबा देवस्थान परिसरातील तलावाचे सुशोभीकरण, क्रीडांगण विकास तसेच अमृत भारत योजनेअंतर्गत एसटीपी प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तळेगाव दाभाडे येथील पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून सुमारे ११६ कोटी रुपयांच्या या योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे बारणे यांनी सांगितले. तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये क्रीडांगणे, ओपन जिम, शाळांसाठी स्मार्ट बोर्ड सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही त्यांनी उल्लेख केला. सुरू असलेल्या कामांचा तीन महिन्यांनी पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर २८ एप्रिल रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही खासदार बारणे यांनी दिली.