Sunil Shelke: वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा! मावळच्या रस्त्यांवरून आमदार सुनील शेळके विधानसभेत आक्रमक
Sunil Shelke: डिसेंबर २०२५ मध्ये आदेश मिळूनही ठेकेदाराकडून दिरंगाई; देहू-येलवाडी रस्त्याच्या रखडलेल्या कामावर शेळकेंची तीव्र नाराजी.

Sunil Shelke – मावळ विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि देहू-येलवाडी रस्त्यांच्या रखडलेल्या कामांचा प्रश्न आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही अधिकाऱ्यांची उदासीनता, नियोजनातील त्रुटी आणि ठेकेदारांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे काम अद्याप रखडल्याचे आमदार शेळके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून हजारो वाहनचालक, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी देहू-येलवाडी रस्त्याच्या कामाबाबतही आमदार शेळकेंनी सरकारचे लक्ष वेधले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी देहू नगरीत दाखल होणार असताना या रस्त्याच्या विकासासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डिसेंबर २०२५ मध्ये कार्यारंभ आदेश देऊनही ठेकेदाराने काम सुरू न केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. लाखो भाविकांची श्रद्धा आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता दोन्ही रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत, अशी ठाम मागणी आमदार शेळके यांनी केली. मावळ तालुक्याच्या विकासाशी निगडित असलेला हा महत्त्वाचा विषय विधानसभेत प्रभावीपणे मांडत आमदार सुनील शेळके यांनी मतदारसंघातील मूलभूत सुविधांबाबत असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.





