Maval News: मावळात खताचा काळाबाजार? २६६ रुपयांचा युरिया ३०० पार; संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेरले
Maval News: खत उपलब्ध असूनही वेळेवर वितरण नाही; शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या दोषी विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी.

Maval News – मावळ तालुक्यात भात पिकाच्या हंगामात युरिया खताच्या तीव्र टंचाईचे संकट निर्माण झाले असताना, काही कृषी सेवा केंद्रांकडून शासकीय दरापेक्षा जादा दराने खत विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कडधे येथील एका कृषी केंद्रात युरिया खताची वाढीव दराने विक्री झाल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला. या प्रकरणी सुमारे १६० ते २०० शेतकऱ्यांनी स्वाक्षरीयुक्त लेखी तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे.
मावळ तालुका हा भात उत्पादनासाठी ओळखला जातो. यंदा अनेक शेतकऱ्यांनी सिंचनाच्या उपलब्धतेवर मान्सूनपूर्व भातपेरणी केली होती. सध्या भाताची रोपे वाढीच्या टप्प्यात असून त्यांना युरिया खताची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र अनेक कृषी केंद्रांवर युरिया उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही खत विक्रेते युरिया खतासोबत इतर खते किंवा कृषी औषधे खरेदी करण्याची सक्ती करत आहेत.
याशिवाय कडधे येथील कृषी सेवा केंद्रात शासनाने युरियाचा अधिकृत विक्री दर २६६ ठरवून दिला असतानाही, शेतकऱ्यांकडून ३०० रुपयांहून अधिक वाढीव रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी (दि. २४) खत उपलब्ध होत नसल्याने आणि वाढीव दर आकारले जात असल्याच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी नागनाथ शिंदे आणि सहाय्यक कृषी अधिकारी सुनील गायकवाड यांना घटनास्थळी घेराव घालत जाब विचारला.
यावेळी समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दरवर्षी पेरणी हंगामात किती खताची आवश्यकता भासते, याची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध असतानाही पुरेसा बफर साठा का ठेवण्यात आला नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. या प्रकरणात कृषी विभाग कोणती भूमिका घेतो आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अधिकारी गैरहजर असल्याबाबत प्रश्नचिन्ह
शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू असताना काळे कॉलनी मंडळ कृषी अधिकारी नितीन राऊत तसेच स्थानिक सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला भोसले उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप असताना संबंधित अधिकारी अनुपस्थित का होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात युरिया खताचा पुरवठा होत नाही. खत उपलब्ध असूनही वेळेवर वितरण न झाल्याने अचानक गर्दी निर्माण होते. शासनाने तातडीने पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा.
– रामभाऊ डोंगरे, भात उत्पादक शेतकरी






