Shrinath Bhimale : पाण्याचा एक थेंबही कमी करू देणार नाही! श्रीनाथ भिमाले यांचा जलसंपदा विभागाला इशारा
Shrinath Bhimale : जलसंपदा विभागाची १५ टक्के पाणीकपातीची मागणी श्रीनाथ भिमाले यांनी धुडकावली; पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी महापालिका ठाम.

Shrinath Bhimale – शहराचे पाणी कमी करण्याबाबत अनेक पत्रे येतात. अशी कितीही पत्रे आली, तरी पुणेकरांचे एक थेंबही पाणी कमी करून देणार नाही, अशी आक्रमक भूमिका महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी घेतली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणी ३१ जुलैपर्यंत शहर, तसेच ग्रामीण भागास देण्यासाठी महापालिकेने १५ टक्के पाणीकपात करावी,
अशी मागणी जलसंपदा विभागाने महापालिकेकडे केली आहे. याबाबत बोलताना पाणी कपातीस विरोध असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. भिमाले म्हणाले, की शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. आधीच पुणेकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिकेच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या.
त्यानंतर आयुक्तांना प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन त्यानुसार पाण्याची सद्यस्थिती काय आहे, काय उपाययोजना केल्या जातील, कशामुळे तुटवडा जाणवत आहे, याबाबत स्थायी समितीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासन त्यानुसार बैठका घेत असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
त्यामुळे आधीच पाणी नसताना त्यात पुन्हा कपात केल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे पुणेकरांचे एक थेंबही पाणी कमी करू दिले जाणार नाही. पाण्याच्या निर्णयाबाबत प्रशासनाची बैठक होणार असली, तरी त्यांनाही स्पष्ट सूचना केल्या जातील.




