Pune District : ‘वाल्हे’त विठ्ठल-रूक्मिणींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी
Pune District : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीसमोर स्वप्नाली देशपांडे व पियुषा देशपांडे यांनी कल्पतकतेने रेखाटलेली रंगीबेरंगी रांगोळी व मंदिर व परिसरात केलेली आकर्षक सजावट ही आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

वाल्हे : वाल्हे (ता.पुरंदर) येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात ”तू विठ्ठल मी विठ्ठल अवघे जन विठ्ठल ” असा गजर करीत भाविकांनी आषाढी एकादशी सोहळ्या दरम्यान, विठ्ठल-रूक्मिणी मुर्तीवर पुष्पवृष्टी केली. दरम्यान,आषाढी एकादशीचे औचित्य साधत वाल्हे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली.मंदिरात विठू नामाचा गजरात, विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेले होते.
वाल्हे येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुग्धाभिषेक तसेच चंदनाचा लेप लावून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना स्नान घालून सुंदर वस्त्रे,अलंकार,तुळशीच्या माळांनी आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आले आहे.तसेच मंदिरामध्ये विद्युत रोषनाईसह फुलांची आकर्षक केलेली सजावट करण्यात आली होती. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे सहा वाजता विठ्ठल रुक्मिणी मूर्तींना अभय देशपांडे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजेचा कार्यक्रम झाला. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.सकाळी आरतीनंतर महिलांनी विठू नामाच्या गजरात पुष्पवृष्टी करीत, विठ्ठलभक्तांनी पूजाअर्चा केली.मंदिरात दिवसभर भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीसमोर स्वप्नाली देशपांडे व पियुषा देशपांडे यांनी कल्पतकतेने रेखाटलेली रंगीबेरंगी रांगोळी व मंदिर व परिसरात केलेली आकर्षक सजावट ही आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
यावेळी माजी सरपंच अमोल खवले, दत्तात्रेय पवार, शिवाजी पवार, कैलास पवार, प्रशांत पवार, रवींद्र दुर्गाडे आदींसह भाविक उपस्थित होते. दरम्यान, माजी सरपंच अमोल खवले,कैलास पवार यांच्या वतीने भाविकांना उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. अभय देशपांडे, जगदीश देशपांडे, स्वप्नाली देशपांडे, पियुषा देशपांडे, समीर देशपांडे, वसंत देशपांडे, पर्णवी देशपांडे, अंजली देशपांडे, अनघा देशपांडे, वर्षा देशपांडे, गोपाळ मांडके, सचिनकाका देशपांडे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. देशपांडे कुटुंबीयांची १२१ वर्षांची आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परंपरा आहे.तसेच पंढरपूरच्या वारीची परंपरा पाचव्या पिढीने सुरू ठेवली आहे.अशी माहिती सचिन काका देशपांडे यांनी दिली.





