Pune District : पुरंदरमधील १० गावांना टँकरने पाणीपुरवठा
Pune District : यावर्षी अद्यापपर्यंत मान्सून पाऊस पुरेशा प्रमाणात पडला नसल्याने, तालुक्यातील अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून,तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच, शेतीच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न तीव्र होत आहे.

वाल्हे : पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपत आले असतानाही पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे सावट आहे. जुलै महिन्यांच्या अखेरीसही शासकीय टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील १० गावठाणासह, परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची आजअखेर १० टॅंकरच्या माध्यमातून, ३१ खेपा करून, येथील नागरिकांसह जनावरांची तहान भागवत आहे.
ऐन पावसाळ्याच्या काळात कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याने,पुरंदरच्या नागरिकांना पुढील काळात पिण्यासाठी, पशुधनासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा प्रश्न पुरंदर तालुक्यातील शहरी,ग्रामीण भागात तीव्र होत आहे. यावर्षी अद्यापपर्यंत मान्सून पाऊस पुरेशा प्रमाणात पडला नसल्याने, तालुक्यातील अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून,तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच, शेतीच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न तीव्र होत आहे.
सद्यःस्थितीत पुरंदर तालुक्यातील १० गावठाणसह, वाड्या-वस्त्यांवर १० पाण्याचे टँकर च्या माध्यमातून दिवसभरात ३१ खेपा सुरू करण्यात आल्या आहेत.अशी माहिती पुरंदर पंचायत समिती कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यांपासूनच दोन टॅंकरच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील जनतेची तहान भागवत आहेत.
कोठे चालू आहेत टँकर ?
पुरंदर तालुक्यातील पिसे, वागदावाडी, राख, राजुरी, वाल्हे, सोनोरी, दौंडज, झेंडेवाडी, टेकवडी, नायगाव या गावठाणसह वाड्या-वस्त्यांवर दररोज १० टँकरच्या माध्यमातून,३१ खेपा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती पुरंदर पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता वैभव ढोक यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत अद्याप पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नसल्याने, येथील जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली नसल्याने, या गावांत सद्यःस्थितीत टँकर सुरू आहेत; पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर, संबंधित ग्रामपंचायतीशी चर्चा करून येथील टँकर बंद करण्यात येतील.
– वैभव ढोक, कनिष्ठ अभियंता, पुरंदर पंचायत समिती.





