Pune District : आषाढी एकादशीनिमित्त आळंदीत भाविकांचा महासागर
Pune District : आषाढी एकादशीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा मुख्य गाभारा विविधरंगी फुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आला होता. रेशमी वस्त्रे, विविधरंगी पुष्पहार आणि देखण्या फुलांच्या आरासीत माऊलींची मूर्ती अत्यंत लोभसवाणी दिसत होती.

आळंदी : देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त शनिवारी आळंदी नगरीत भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला. पहाटेपासूनच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या वारकरी, भाविक आणि पर्यटकांनी मंदिर परिसर गजबजून गेला. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भक्तांनी माऊलींच्या चरणी माथा टेकत दर्शनाचा लाभ घेतला. रिमझिम पावसाच्या सरी आणि दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी नदी यामुळे संपूर्ण आळंदीचे वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले होते.
पहाटेपासूनच दर्शनासाठी मुख्य दर्शनबारीत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मोशी, केळगाव, चाकण, वडगाव, मरकळ, चर्होली तसेच पुणे मार्गावरील सर्व रस्ते भाविकांच्या वाहनांनी आणि पायी चालणार्या वारकर्यांनी फुलून गेले होते. सर्वत्र विठ्ठल-नामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळत होते.
आषाढी एकादशीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा मुख्य गाभारा विविधरंगी फुलांनी आकर्षकपणे सजविण्यात आला होता. रेशमी वस्त्रे, विविधरंगी पुष्पहार आणि देखण्या फुलांच्या आरासीत माऊलींची मूर्ती अत्यंत लोभसवाणी दिसत होती. विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या परिसरातही फुलांची देखणी सजावट करण्यात आली होती. गाभार्यातील सुगंधी आणि मनोहारी वातावरणामुळे काही क्षणांचे दर्शनही भाविकांना आध्यात्मिक समाधान देणारे ठरत होते.
मावळ परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मंदिरालगतच्या संपूर्ण नदीपात्राभोवती बॅरिकेट्स उभारून नागरिकांना आणि भाविकांना नदीत उतरण्यास मज्जाव करण्यात आला होता. नदीकाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी सतत गस्त घालत होते. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले.
आषाढी एकादशीनिमित्त मंदिर परिसरासह आळंदीतील प्रमुख रस्त्यांवर धार्मिक साहित्य, पूजेचे साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणावर सजली होती. दर्शनानंतर भाविकांनी खरेदीचा आनंद घेतला. लहान मुलांनी आपल्या आवडीच्या वस्तूंसाठी पालकांकडे हट्ट धरल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.
आषाढी एकादशीमुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्याने युवक-युवतींचीही आळंदीत मोठी गर्दी झाली होती. इंद्रायणी नदीवरील पुलावर, घाट परिसरात तसेच माऊली मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अनेकांनी छायाचित्रे आणि स्वचित्रे टिपून या भक्तिमय क्षणांची आठवण जपली.
वाढत्या गर्दीमुळे प्रवेशावर तात्पुरते निर्बंध
माऊलींचे आजोळघर असलेल्या गांधीवाड्यापासून सुरू होणार्या मुख्य दर्शनबारीत सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली होती. मंदिरातील वाढता भाविकांचा ओघ लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्य दरवाजातून होणारा प्रवेश काही काळासाठी बंद केला. त्यानंतर गणेश दरवाजा आणि हनुमान दरवाजातूनही वाढती गर्दी लक्षात घेऊन काही काळ प्रवेश रोखण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा प्रवेश सुरू करण्यात आला, तर मुख्य दरवाजा केवळ बाहेर पडण्यासाठी खुला ठेवण्यात आला. या उपाययोजनांमुळे गर्दीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले.
फिरत्या वैद्यकीय सेवेचा भाविकांना मोठा दिलासा
मुख्य दर्शनबारी सुरू होणार्या ठिकाणी फिरत्या वैद्यकीय वाहनातून भाविक, वारकरी आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या वाहनामध्ये डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधे लिहून दिली जात होती, तसेच त्याच ठिकाणी औषधांचे मोफत वितरणही करण्यात येत होते. या सुविधेचा दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला.





