Hingoli News : कर्जमाफीच्या घोषणेनंतर हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना: कर्जाच्या तणावातून शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवलं
Hingoli News : कळमनुरी तालुक्यातील साळवा शिवारात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शेतातील कापसाच्या फासावर पेटून घेतल्याने याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःलाच कापसाच्या पाळट्याच्या फासावर पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यातच कर्जमाफीची घोषणा केली होती, त्यानंतर काही दिवसांतच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपली आहे. यामुळे शेतकरी कर्जमाफीची घोषणा फोल ठरत असल्याचे बोलले जात आहे.
कळमनुरी तालुक्यातील साळवा शिवारात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शेतातील कापसाच्या फासावर पेटून घेतल्याने याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे साळवा गावात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार बँकेच्या कर्जाच्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव दत्तराव डीगंबर माखणे (वय 48) असून ते कळमनुरी तालुक्यातील साळवा गावचे रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. तर मुलीचे लग्न झालेले आहे. त्यांच्या नावावर साळवा शिवारात सुमारे अडीच एकर शेती होती. त्या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीच्या कामासाठी त्यांनी भारतीय स्टेट बँकेचे कर्जही घेतले होते. मात्र काही काळापासून शेतातून उत्पादन न झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रब्बी हंगामातही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे कर्जफेड कशी करायची याची चिंता शेतकरी दत्तराव माखणे यांना सतावत होती. या आर्थिक तणावामुळे ते गेल्या काही दिवसापासून तणावात होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री ते शेतात जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाही. त्यांचा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी केला परंतु तोही झाला नाही.
त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. रात्री उशिरा त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता तिथे धक्कादायक दृश्य दिसून आले. शेतातील कापसाच्या फासावर दत्तराव माखणे यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी त्यांचा मोबाईल फोन, पाण्याची बाटली आणि चप्पल या वस्तू मृतदेहाच्या बाजूला दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी स्वतःलाच जिवंतपणे कापसाच्या पऱ्हाटेच्या फासावर पेटवून घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कळमनुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेम कुमार माकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे तसेच दमदार पोलीस यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी नामदेव मागणे यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात बँकेच्या कर्जाच्या तणावातून दत्तराव माखणे यांनी हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे



