Ravindra Chavan : सध्या राज्याचे अधिवेशन सुरु असून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. अनेकदा चर्चेवेळी खंडाजंगी देखील होताना दिसते. आमदाराने प्रश्न विचारल्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री अनुपस्थित असतात. कधी कधी ज्या खात्याच्या मंत्र्यांला प्रश्न विचारला आहे, त्यावेळी दुसऱ्या खात्याचे मंत्री उत्तर देतात. अनेकदा मंत्री आणि आमदार सभागृहात उशिरा येतात किंवा मग गैरहजर असतात. दोन्ही सभागृहात या गोष्टी होताना दिसत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत हातात सापडते. अशातच भारतीय जनता पार्टीने एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक मंत्री आणि आमदाराला रिपोर्ट कार्ड सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या संबंधी एक बैठक पार पडली असल्याची माहिती मिळत असून, या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षातील मंत्री आणि आमदारांचे कान टोचल्याची माहिती आहे. विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, अशा कडक शब्दांत रविंद्र चव्हाण यांनी आमदार व मंत्र्यांची शाळा घेतली. बैठकीत आमदार आणि मंत्र्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळात गैरहजर राहताना पक्षाला लेखी कारण द्यावे लागणार आहे. कोणतीही माहिती न देता गैरहजर राहिल्यास संसदीय कामकाज मंत्री कारवाई करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. विधिमंडळातील गैरहजेरीवरून भाजप आमदार आणि मंत्र्यांवर पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. ‘या’ सूचना देण्यात आल्या आहेत. (Ravindra Chavan) पक्षातील मंत्री आणि आमदाराला काही महत्वाच्या सूचना घालून देण्यात आल्या असून, त्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असणार आहे. १ सकाळी सभागृह सुरू झाल्यापासून सायंकाळी संपेपर्यंत सर्व आमदार व मंत्री यांना सभागृहात बसणं बंधनकारक असेल. २ पाच आमदारांचा एक गट तयार करून एका आमदाराकडे या गटाची जबाबदारी देण्यात आली आहे. ३ संबंधित आमदार किती वेळ सभागृहातील कामकाजात सहभागी होतात? याचा रिपोर्ट गटाचा आमदार हा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे देईल. ४ मंत्र्यांच्या कामकाजावर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वॉच असणार आहे. ५ सभागृहात अनुपस्थित राहण्यासाठी कुठलीही बैठक किंवा तत्सम महत्त्वाचे काम असेल, तर संबंधित आमदार व मंत्र्याला तसे लेखी कारण हे पक्षाला कळवावे लागेल. ६ कुठलीही सबब न देता अनुपस्थित राहणाऱ्या आमदारावर पक्ष, तर मंत्र्यांवर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील कार्यवाही करतील. ७ यापुढे अनुपस्थित राहण्यासाठी लेखी कारण देणे बंधनकारक असणार आहे. हेही वाचा : Shivsena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी